अगदी बरेच दिवस काही केल्या गाडी(ब्लॉगची) रुळावर येत नव्हती किंवा स्वतःला कामाच्या व्यापात इतकं जखडून घेतलं की गाडी रुळावर येऊ पाहत नव्हती, हे कोडे मला तरी उलघडत नाही आहे. पण ह्या पांडुरंगाच्या नावाने आणि अकारण कारुण्याने पुन्हा एकदा की गाडी चालवायला घेऊया, हे ठरवलं आणि आपसूकच ह्याच अनंतमयी पांडुरंगाच्या महतीच्या काही ओळी सुचल्या त्या ह्या पांडुरंगा चरणी अर्पण करतो आणि माझ्या आयुष्याची "वारी" तुझ्या पर्यंत पोहोचण्याची अखंडपणे चालूच राहो, ही देवा विठ्ठला तुझ्याच चरणी प्रार्थना...



मनोमनी तुझा रे मी वारकरी...

काय आहे तुझे रूप,
काय आहे तुझी कीर्ती,
जे काही साठवले ते सर्व,
अर्पितो तुझ्याच रे पायी...

तुझा रंग कसा हे वेगळा,
तुझ्या नामाचा छंद आगळा,
तुझ्या तालावर नाचावयाला,
आलो आज रे तुझिया दारी...

इतरांकडे काही मागत नाही,
भरलास तूच ह्या दिशा दाही,
सोडियेली आता चिंता सारी,
पायी मारण्या रे घट्ट मिठी...

सुखाने भरली तू झोळी माझी,
ओवी गातो मी नेहमीच तुझी,
प्रत्यक्ष जरी येणे जमले नाही,
मनोमनी तुझा रे मी वारकरी...

प्रणिल टाकळे