जपून जपून जपून जा रे.... 

                  कृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्याला माहीत आहेच की महाविष्णूच्या कृष्ण ह्या रूपाचा जन्म दिवस. आता अगदी प्रत्येकाला कृष्ण जन्माची पूर्ण कथा माहीत आहेच. तसेच त्याच्या लहानपणीच्या निरनिराळ्या लीला सुद्धा माहीत आहेतच. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच लोणी खूप आवडीचे असते. व त्यासाठी तो गोकुळात अनेकांच्या घरी जाऊन लोणी चोरून खात असे. लोणीच्या मडक्यापर्यंत हाथ पोहोचावा म्हणून आपल्या सवंगड्याच्या सहाय्याने थर लावून त्यावर चढून त्या उंचवरच्या मडक्यातले दही, लोणी आवडीने श्रीकृष्ण खात असे आणि इतरांनाही वाटत असे.

                     श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण काळापासून गोपाळकाला सण साजरा केला जातो. एकवर एक असे मानवी मनोरे उभारून उंच बांधलेली दही हंडी फोडायची असते. ज्यात एकमेकाला हाथ देऊन आधार दिला जातो आणि एकजुटीने महत्व पटवून दिले जाते. एक एकसंघपणा पाहायला मिळतो.

                    आधी चार थर अशी दही हंडी करून हा सण साजरा केला जात असे. पण सध्या ह्यात स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे. तब्बल आठ तर नऊ थर लावून जवळ जवळ अनेक फूट उंच बांधलेली दहीहंडी फोडली जाते. व ह्यात अनेक लाखाची आणि मानाची हंडी जागोजागी असते. हा उंच थरार पाहूनच आपल्या मनात धडकी भरते की एवढ्या उंच प्रमाणात कसलाच आधार ना घेतला एवढ्या व्यक्ती वर चढून हा मनोरा रचून ही स्पर्धा केली जाते. दहीहंडी फोडली जाते, अनेक जण उंचावरून पडतात. प्रचंड प्रमाणात लागतं सुद्धा. अनेकदा असे जीव जातात किंवा कायमचे शरीर निकामी होऊन जाते. कोणाला खांद्याचे त्रास तर कोणाला पायाचे, गुडघ्याचे त्रास उद्भवतात व ते आयुष्यावर जडतात.

                      सध्या हे प्रत्येक जण स्वतःचा विमा काढून घेतात. का??? कारण त्यांना माहीत असतेच की ह्या खेळात रिस्क आहेच. आणि कोणती ना कोणती दुखापत होणारच आहे. हा विमा चुकून त्यांच्या काही बरं-वाईट झाल्यावर त्यांच्या कुटुंबांना त्याचा मोबदला मिळणार असतो, ह्यासाठी ही काढतात. मला मान्य आहे की गोपाळकाला हा दही हंडी शिवाय अपुरा आहे. मात्र त्यात कोणामुळे सणाला गालबोट लागू नये ही काळजी अगदी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण ह्या सणाला आज पर्यन्त अनेकदा बातमी झळकत असते की अमुक अमुक व्यक्ती पडला किंवा दगावला. ऐकताना सुद्धा अंगावर त्यावेळी काटा येतो. कारण हा विचार त्यांनी केला पाहिजे की आपण जो आज थरार करायला जात आहोत, मग आपल्या मागे आपले कुटुंब आहे ज्यात आई वडील किंवा बायको व लहान मुले आहेत. आपल्याला काही झालं तर त्यांना काय होईल आणि पैसे विम्याचा मिळाला तरी किती दिवस पुरणार आहे???

                      मोठमोठ्या बक्षिसांची आमिषे दाखवली जातात. मानाच्या हंड्या बांधल्या जातात. मात्र एवढ्या उंचावर चढून हजारो लोकांमध्ये पडलेला व्यक्ती कोण आहे कसा आहे ह्याची विचारपूस केली गेली पाहिजे, त्यांना प्रथमोपचार लवकरात लवकर मिळाले पाहिजे. नाही तर बघ्यांची गर्दी जास्त असेल आणि जखमी गोविंदाला तिथे पोचायला वेळ जाईल, हा विचार केला गेला पाहिजे.

                       सण आहे. तो पवित्र आहे मग त्याच पावित्र्य सुद्धा तसंच राखलं गेलं पाहिजे. आपण त्या श्रीकृष्णाचे गोप बनून दहीहंडी साजरी करायला निघतो. मात्र अश्या वेळी ज्यांना ही दहीहंडीची कला अवगत आहे त्यांना चांगल्या नजरेने पाहिले जाते की ह्यांना एवढ्या उंचीवर जाऊन ही हंडी फोडता येते. मात्र त्याचवेळी मोठ्या ट्रक, टेम्पो मधून प्रवास करताना आजूबाजूला जाणाऱ्या प्रवासींनीही त्रास देणे, छेडणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र आपण अश्या सणाच्या प्रसंगी असे वागणे चुकीचे आहेच. माझी प्रत्येक गोविंदा पथकाला एक विनंती आहे की अशी मस्करी किंवा चुकीचे वर्तन कोणत्याही स्त्रीशी जाता येताना करू नका. कारण भारतासारख्या मोठ्या देशात स्त्रीला एक उच्च स्थान आहे. व आपल्यालाही आई, बहीण आहे व आपल्या समोर कोणी त्यांचाही असा आपल्या सारखा अपमान करू शकतो. म्हणून आपण ही करू नये आणि श्रीकृष्णाचे उत्तम गोप बनून त्याच्या ह्या सणाचा आनंद मनापासून घेऊ.

                     दहीहंडीचा थरार नक्कीच अनुभवा पण जे काही कराल ते जपून करा आणि एकमेकांना मदत करा.

प्रणिल टाकळे.