लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे धम्माल, मजा-मस्ती, हळदी समारंभ, नाच-गाणे, लग्नाच्या मंगलविधी, मंगलाष्टका आणि मुलीची पाठवणी.
गेल्याच आठवडयात माझ्या बहिणीचे लग्न झाले. दिसायला सुंदर राजकुमारीसारखी ती. घर अगदी साधे, मध्यमवर्गीय. घरातल्या चालीरिती अगदी पारंपारिक पण तरीही आधुनिकतेकडे वळालेले सर्वजण.
मुलीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचा काळ म्हणजे आई-वडिलांसाठी वेगळ्याच आठवणींनी भरलेला असतो. सारखपुडा झाला तेव्हाच मनात आले की "खरचं आपली ताई किती लवकर मोठी झाली ना? खोडया-मस्करी करताना मिश्किल हसणारी आपली ताई लवकरच लग्न होऊन निघून जाणार. नवीन घर सजवायला. नवीन आयुष्य घडवायला.
" हळद लागली तुला आज,
चढेल उद्या सोनेरी साज"
आंब्याच्या पानाने लावली जाणारी हळद, एक एक नातेवाईक आपल्या लेकीला, बहिणीला, आत्याला, नातीला, पुतणीला हऴद लावताना आपल्या आठवणी जागवत होते. आणि उद्या निघताना ह्याच आठवणींचा आधार असणार आहे, ह्या विचाराने हुंदका देत हळद लावून घेणारी तू..
ताई आजही आठवतेस.
सकाळी घरच्या देवाला नमस्कार करुन उंबरठ्याजवळ आलीस. संपूर्ण नजरेत मावोन्मावो तरीही घराला डोळ्यात साठवून तू निघालीस. पाऊले जरी पुढे टाकत होतीस तरी मागे घरात अडकलेला जीव तू सोडवत होतीस.
नऊवारी पिवळी साडी लेवून जेव्हा तू आलीस, डोळ्यांचे पारणे फिटून गेले. नव-यामुलाकडच्या प्रत्येकाने येऊन सांगितले..
"अहो, खूप सुंदर आहे तुमची मुलगी!!
तुझी बहिण खूप सुंदर दिसते..!"
" आली लग्न घटीका समीप नवरा..."
सुरु झाली ही मंगलाष्टका. धीरगंभीर स्वरांमुळे डोळ्यांच्या कडा पाणावल्या. "शुभमंगल सावधान" म्हणून लग्न संपन्न झाले. सप्तपदी करताना भावोजींनीताईला दिलेल्या प्रत्येक वचनातून मिळालेली आम्हांला निश्चिंतता मनात कायमची घर करुन गेली.
आणि मग तो शेवटचा क्षण...
"सासरलाही बहिण निघाली"
अखेर तो बांध फुटला. अश्रू अनावर झाले. प्रत्येकाच्या गळ्यात, मिठीत हुंदके देत विसावणारी ताई तू आजही आठवतेस."वचन द्या सुखी ठेवून काळजी घ्याल हिची..."
सर्वानी असे वचन जेव्हा घेतले, तेव्हा निघाली ताई.. नवीन जीवनात... नवीन सुरूवात करण्यासाठी....
शेवटी सर्वांच्या मनात एकच इच्छा...
"लेक निघाली सासरी,
आठवणी ठेवूनी तिच्या माहेरी,
एकच इच्छा ही आहे आता,
नांदो दोघे सुखी संसारी...
0 comments