"गुढी पाडवा आणि मराठी संस्कृती-- संकल्पांची करु पुर्ती"


                चैत्र महिना. हिंदू धर्माचा खूप मोठा आणि आनंदाचा सण अर्थात नववर्षाचा आरंभ. आपण आपल्या रोजच्या वापरात इंग्रजी महिन्यांचा अवलंब करतो पण एक लक्षात आले का? गेली एवढी वर्षे आपण १ जानेवारी हा दिवस वर्षाचा पहिला दिवस म्हणून पाहतो. बहुतेक सर्वांना ह्या दिवशी सुटटी असल्याने आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी आणि विविध समारंभामुळे आपण दमलेलो असतो मग नवीन वर्षी लवकर उठण्यापेक्षा आपली सकाळ आरामात होते. १ जानेवारी (नवीन वर्षाचा पहिला दिवस) हवा तेवढा जल्लोषात साजरा होत नसेल त्याहीपेक्षा मराठी महिन्याचा पहिलाच दिवस "गुढी पाडवा" मोठया थाटात, जल्लोषात, आनंदात  आपण साजरा करतो.
                  ह्या दिवसाची आताच्या लहान पिढीला म्हणजेच शाळेत जाणा-या मुला-मुलींना नेमके महत्त्व माहिती नसते, कारण काळाची गरज म्हणून सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यामातून शिकवतात. पण नाताळ आणि दिवाळी सारखेच इतर "मराठी  सण आणि संस्कृती"ची ओळख मुलांना करवून देण्याची मुख्य जबाबदारी पालकांची असते.
             नवीन वर्ष म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतात ते म्हणजे नव वर्षाचे संकल्प. काही जण मोठा संकल्प करतात तर  काही जण लहान. आणि मग त्या संकल्पानुसार आपलं जीवन हळूहळू आपण बदलायला लागतो. प्रत्येकालाच वर्षभर संकल्प पाळता येतोच असे नाही. पण आपण जसे १ जानेवारीला एखादा संकल्प करतो तसा गुढी पाडव्याला का नाही  करत? तर नक्कीच करायला हवा. समजा तुम्ही १ जानेवारीला एक संकल्प केलेला होता. पण काही कामांमुळे तो हळूहळू पाळण्याचा राहून गेला. मग काय आपण विचार करतो की नको आता तो संकल्प. काय उपयोग आहे आता त्या संकल्पाची. पुढच्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने करु. पण एक कल्पना आहे माझ्या मनात. जो संकल्प आपल्याकडून अर्धवट राहिला असेल तर तो आपण गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा सुरु करुया. म्हणजे आपण संकल्प अर्धाच राहिला हे दुःख वर्षभर मनात रहायला नको. आपल्याला पुन्हा एक सुवर्णसंधी आहे, आपण संकल्प करण्याची. कारण पाडवा हाच आपला नववर्षाचा पहिला दिवस..मग संकल्प करायला तर नक्कीच हवा.
                    आपल्या हिंदू परंपरेत मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की मुहूर्त बघून काम करण्यास सुरुवात केली तर काम यशस्वीरित्या पार पडते. गुढी पाडवा ही साडे तीन मुहूर्तापैकी एक अतिशय शुभ दिवस आहे. (गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, लक्ष्मीपुजन असे मुहूर्त म्हणजेच साडेतीन मुहूर्त). ह्या दिवसाला कधीही, कोणतेही कार्य करताना वेगळा मुहुर्त पाहण्याची गरज नसते. कारण संपुर्ण दिवसच शुभ मानला जातो.



---> गडू(कलश)- यश आणि भरभराटीचे प्रतिक.

--->सुगंधी फुलांचा हार- मांगल्याचे प्रतिक.

--->कडुलिंबाचा पाला- आरोग्य( औषधी  वनस्पती, मधुमेह आणि                                       शरीरातील सारखेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी.

---> साखर गाठ- माधुर्य, मनातला जुना कडवटपणा दूर सारुन मधुरतेला                         स्वीकारा.

---> जरी साडी(खण)- वैभवाचे प्रतिक

---> वेळूकाठी- सामर्थ्याचे प्रतिक.

---> श्रीफळ- सिद्धीचे प्रतिक.

---> पाट- स्थिरतेचे प्रतिक

---> सुपारी- संकल्प(नववर्षाचे संकल्प)

                 ह्या संपुर्ण गुढीमध्ये आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणा-या गोष्टीचा भरभरुन समावेश आहे. गुढी पाडवा म्हटलं की, नजरे समोर येतात ते रांगोळयांनी भरलेले रस्ते. गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली ह्या भागात वेगवेगळ्या जनोपयोगी संदेशाचा समावेश करुन शोभायात्राही पहायला मिळतात.
                तर काय मग... करणार ना या गुढी पाडव्याला संकल्प? विचार करत बसू नका. नक्कीच संकल्प करा. जर जुना संकल्प राहिला असेल तर तो ही मनात काही शंका-कुशंका न ठेवता पुर्ण करायला लागा.

प्र-निलयम्  तर्फे गुढी पाडव्याच्या व  नववर्षाच्या चैतन्यमयी, सौख्यदाय़ी शुभेच्छा...!





प्रणिल टाकळे