"वटपौर्णिमा - तंत्र नवे सूत्र जुने"
आज ज्येष्ठ पौर्णिमा. सर्व महिलांचा आवडता दिवस. म्हणजेच "वटपौर्णिमा". ह्या दिवशी स्त्री वर्ग आपल्या पतीसाठी व्रत करुन त्यांच्या सुखकर आयुष्यासाठी वडाची पुजा करतात. पण सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक स्त्रीला हे अगदी कमी वेळात करता आलं तर?? आणि ते ही आपल्या स्वतःच्या घरात किंवा ऑफिसमध्ये बसून?? आहे की नाही Interesting???
जवळजवळ सगळया ऑफिसला जाणा-या स्त्रीयांकडे मोबाईल असतोच. त्यांच्यासाठी तर खूपच सोपी गोष्ट आहे.
"वटपौर्णिमा घरच्या घरी " हे Anroid app आपल्याला मोबाईलवर असेल तर आपण सहजरित्या पूजा करु शकता. मोबाईलवर ऍप इन्स्टॉल झाल्यावर यातच तुम्हाला पुजेचे साहित्य उपलब्ध होईल. ज्यात आपण आपल्याला हवी असलेली पाच फळे निवडू शकतो. वडाला बांधण्यासाठी दोरा हवा तेवढा लांब निवडू शकतो. वाणांची संख्या निवडून आपली पूजनाची पूर्वतयारी करु शकतो. आणि मग समोर दिसणार्या वडाच्या झाडाला क्लिक करुन आपल्या सात फेर्या पूर्ण करता येतील. पूजा झाल्यावर दोर्यामध्ये गुंडाळलेला वड आपल्याला समाधान देईल.
खरचं किती मस्त आहे ना App?
शोधायला जाताय का प्ले स्टोरवर हे भन्नाट App??
थांबा थांबा...
हे ऍप अजूनही माझ्या कल्पनाविश्वात आहे गुगलच्या विश्वात नाही. पण आपले टेक्नॉलॉजीचे ऍडीक्शन पाहता पुढील काही काळात असे ऍप निश्चितच येईल. आणि मग कदाचित प्रत्येक स्त्री मोबाईलवर वडाची पुजा करेल.
अतिशोयोक्ती आहे ना!!!
पण परिस्थिती तशीच येऊन ठेपली आहे. कारण वडाची पुजा करायला आता वडच शिल्लक राहीलेले नाही. पूर्वी जागोजागी वटवृक्ष दिसायचे. मात्र आता त्यांची जागा सिमेंटच्या वृक्षांनी घेतलेली आहे. या वाढत्या सिमेंटच्या जंगलात वटवृक्षालाही आपला पसारा आवारता घ्यावा लागतोय. कारण इथे माणसांना राहयला जागा नाही वटवृक्ष किती स्केवरफूट व्यापणार. त्यामुळे पुर्वी पारापारावर जमणार्या स्त्रिया आता घरात एक फांदी आणून वडाची पूजा करु लागल्या आहेत. पुढे फांद्यापण मिळेनाश्या होतील मग आपले गुगल महाराजच आपल्याला वडाचे दर्शन घडवतील.
मला आठवतेय माझी आई वडाची पूजा करायला मंदिरात जायची. तिथे वडाची पूजा केल्यानंतर वाण अर्पण करायची. अत्यंत भक्तीभावाने ती पूजा करायची आणि आम्ही बच्चे कंपनी त्या वाणामधील कोणते फळ आमच्या वाटाल्या येईल यासाठी आतुर असायचो. घरात आंब्यांची फसणाची आणि इतर फळांची कमी नव्हती. पण डोळा मात्र या वाणातील फळांवर असायचा. वडाला अर्पण केलेले फळ भक्तीभावाने खायचो. क्वचित वाण गपचूप पळवून पण न्यायचो. खूप धम्माल करायचो. पण आत्ताची नविन पिढी हे सगळ कस अनुभवणार???
वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा खरच चांगली आहे. निसर्ग आणि मानवाचे नाते स्पष्ट करणारे आहे. पण त्याच निसर्गाच्या पूजेबरोबर त्याचे संवर्धन देखील करणे आवश्यक आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून काही स्त्रियांनी एकत्र येऊन वटवृक्ष लावायला काय हरकत आहे. या दिवशी वटवृक्षाला आपला पती मानून स्त्रीया पूजा करतात. वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळो व सतत त्याच्या प्रगतीचा विस्तार होत राहो ही मनोकामना करतात. सात जन्म हाच पती मिळावा म्हणुन प्रार्थना करतात. थोडक्यात आपल्या पती विषयी आदर, प्रेम, विश्वास या पूजेतून व्यक्त करतात.
माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की, पूर्वीच्या काळी स्त्रिया आपले प्रेम आपल्या पतीपूढे मोकळेपणाने व्यक्त करीत नसत. तसे करणे कदाचित शिष्टाचारात बसत नसे. मग ती स्त्री अनेकविध कृतीतून अथवा अशा व्रत वैकल्यातून आपले पती विषयी आदर, प्रेम, विश्वास व्यक्त करीत असावीत. असे असेल तर आजही ही पूजा करताना मनात तसाच भाव हवा. ही पूजा प्रेमाने केली पाहीजे. जर मनात पती विषयी प्रेम नसेल किंवा पती त्या लायकीचाच नसेल तर त्या बिच्चार्या वटवृक्षाला कमकुवत दोर्यांच्या आत कशाला गुरफटवायचे?
वटवृक्षाला दोरा बांधणे ही कृती विशेष काही तरी निर्देश करते असे मला वाटते. हा वटवृक्ष म्हणजे पती आणि जो धागा त्याच्याभोवती गुंडाळला जातो तो म्हणजे पत्नी. या पतीला पत्नीने किती व्यापून टाकले आहे किंवा तस ती त्याचे आयुष्य व्यापते. हे इथे स्पष्टपणे निर्देश होते असे वाटते. ज्या पतीचे आयुष्य पत्नी संपूर्णपणे व्यापते आणि जो पती पत्नीला आपल्याशी कायमचा बांधून घेतो त्यांचाच संसार सुखाचा व चिरकाल टिकणारा होतो. नाही का?
स्त्रीचे कुटुंब प्रथम तिच्या पतीपासून सुरु होते. व तिकडूनच त्यांच्या सुखी कुटुंबाचा विस्तार वडाप्रमाणे हळूहळू होत जातो. आधी एक लहान रोपटं, मग त्याची कलेकलेने होणारी वाढ, त्याला येणा-या पारंब्या, पारंब्या जमिनीत जाऊन नवे वडाचे झाड...अशाप्रकारे वडाप्रमाणेच प्रत्येक स्त्रीचे विस्तारत जाणारे कुटुंब, हे वेगवेगळे नसून समानच आहेत.
वटपौर्णिमेला पूजा केली काय किंवा नाही केली काय पण या दिवसाचे सूत्र लक्षात ठेवले नाही...तर काहीच उपयोग नाही. सावित्रीने आपल्या प्रेमाने सत्यवानचा मृत्यू पण व्यापून टाकला. ही स्त्री शक्ती आहे. आणि स्त्री शक्ती तिच्या प्रेमात सामावलेली आहे. ह्याची जाणिव प्रत्येक स्त्री तसेच पुरुषाला असायलाच हवी.
आज वटपौर्णिमेनिमित्त अनेक जोक्स वॉटस अपवर येत आहेत. पण भारतीय संस्कृतीने दिलेली मूल्ये आपण पाळली नाहीत तर भविष्यात आपले आयुष्य जोक बनून राहू शकते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृती पेक्षा अधिक भावाला महत्त्व आहे.
आजची पूजा कशी करायची हे ज्याचे त्यानी ठरवावे... अगदी परदेशात राहणार्यांनी लॅपटॉपवर केली तरी हरकत नसेल...
…पण कृती पेक्षा ही भाव महत्त्वाचा...मूल्य महत्त्वाची...सूत्र महत्त्वाचे हे ध्यानात असावे....
प्रणिल टाकळे
0 comments