आठवणीतले डॉ. कलाम

                   फार फार पूर्वीची ही गोष्ट आहे. एके दिवशी एका शास्त्रज्ञच्या कंपनीमध्ये जवळ जवळ ७० कर्मचारी काम करत असतात. अगदी व्यस्त अशा कामात प्रत्येकजण स्वःताला झोकून देऊन काम करत असत. त्या ७० जणांचा बॉस हा शिस्तप्रिय आणि कामाबाबत काटेकोर होता. त्यांच्या ह्या कामाबाबतच्या कडक शिस्तीमुऴे इतर कामगार खूप अस्वस्थ होत. मात्र कधीही कुणीहीव्यक्ती ती कंपनी सोडून जाण्याचा विचारही करत नव्हती.  सर्वजण बॉसने सांगितलेल्या कामाशी एकनिष्ठ राहून काम पुर्ण करत असत.

                     एके दिवशी एक शास्त्रज्ञ कर्मचारी त्या बॉसला जरा घाबरून विचारु लागला. "सर, आज मला लवकर घरी जाण्याची परवानगी द्याल का?" बॉसने विचारल, "का रे, काही काम आहे का?" त्यावर तो कर्मचारी म्हणाला, "होय सर, आज मी माझ्या मुलांना वचन दिलं आहे की संध्याकाळी लवकर येऊन विज्ञान प्रदर्शन दाखवायला घेऊन जाईन. त्यासाठी मला त्यांच्या आनंदासाठी शहराकडे घेऊन जायचं आहे." त्यावर बॉस फक्त "ओके" एवढंच म्हणून तू ५.३० वाजता निघालास तरी चालेल असं म्हणाले. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे त्या कंपनी मधील प्रत्येकजण कामात टंगळमंगळ न करणारा होता. त्याचप्रमाणे तोही कर्मचारी स्वःताला नेमून दिलेलं काम करत होता.  तो कामात एवढा मग्न झाला की त्याला वेळेचं भानचं उरलं नाही. आणि जेव्हा त्याने अचानक घडयाळ पाहिलं तेव्हा घडयाळ्यात ८.३० वाजले होते. त्याला तो काही तरी विसरला आहे त्याची जाणिव झाली. त्याने त्याच्या बॉसच्या केबिनकडे पाहिले तर त्याला समजले की बॉसही सर्व काम संपवून घरी गेले आहेत.

                       मग तो कर्मचारी उदास होऊन घरी येतो. कारण त्याच्या मनात खंत होती की लहान मुलांना दिलेलं वचन आज पुर्ण करता नाही आलं आणि त्याहीपेक्षा घरी गेल्यावर मुलांनी विचारल्यावर त्यांना काय उत्तर द्यायचं, ह्याही विचारांचा कोलाहल त्याच्या मनात सुरु होता.

                   घरी गेल्यावर  घर शांत होते. त्याच्या पत्नी शांतपणे मासिक वाचत होती. तिने लगेच हळूवार शब्दांत विचारले. "अहो, तुम्ही कॉफी घेणार का की तुम्हांला भूक लागली असेल तर जेवणांची ताटंच घेऊ?" त्यावर पती ने शांतपणे उत्तर दिले की "जर तूही माझ्या बरोबर कॉफी घेणार असशील तरचं कॉफी कर." पतिच्या ह्या सांगण्यावरुन पत्नी स्वयंपाकघरात कॉफी करण्यात गुंग झाली. तितक्यातचं काही तरी वेगळं वाटतंय असा विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले की आपल्या मुलांचा चिवचिवाट ऐकू येतं नाही. म्हणून तो पत्नीला विचारतो की " अगं, मुलं कुठे गेली आहेत? त्यांचा आवाजचं कसा नाही घरात?" त्यावर कॉफीचा कप हातात देताना पत्नी म्हणाली, " दोन्ही मुलं विज्ञान प्रदर्शन बघायला गेली आहेत. तुमचेच बॉस त्यांना घेऊन गेले आहेत. घरी येताना सोडून जातील असं ही म्हणाले आहेत."

                      त्यावेळी  त्याला कळून चुकते की आपण आपल्या कामात मग्न असतानाच बॉस मुलांसाठी येऊन त्या प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन गेले. कामात अगदी चोख असूनही नातेसंबंधातही वेळ देणारे बॉस त्या कर्मचारीला प्रथमच दिसले.
                      बॉसला सांगितलेले शब्द आठवले की, "आज मुलांच्या आनंदासाठी त्यांना प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन जायचे आहे." आणि नेमके हेच शब्द बॉसने हेरले होते. आणि त्यामुऴेच बॉसने येऊन त्या साध्या कर्मचा-याच्या मुलांना त्यांच्या आनंदा साठी प्रदर्शनासाठी घेऊन गेले.

                   हा बॉस त्यांच्या कंपनीत काम करणा-या प्रत्येक कर्मचारीला त्यांच्याच कुटुंबाचा भाग मानत असतं. आणि वेळ पडल्यावर कुटुंब प्रमुख ह्या नात्याने प्रत्येकाला पडेल ती मदत करण्यासाठी मागेपुढे बघत नसतं, ह्यासाठी वरील उदाहरणचं सर्व काही सांगून जातं.

आता आपण म्हणालं की कोण हा नेमका बॉस?
 
उत्तर एकचं... डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

                भारतरत्न म्हणून गौरविलेले भारताचे  अत्यंत लाडके माजी राष्ट्रपती. त्यांच्याबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमीच पडेल. कारण हे अभूतपुर्व व्यक्तीमत्त्व सर्व वर्णनाच्याही पलिकडचे आहेत. लहानांपासून ते थोरांपर्यंत अगदी लाडके शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख सदैव प्रत्येक भारतीयच काय पण संपुर्ण जगभरात जपली जाईल, ह्या तिळमात्र शंका नाही.

             "मिसाइल मॅन" म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या अवलिया शास्त्रज्ञाने काल दि. २८ जुलै २०१५ रोजी वयाच्या ८४ वर्षी जगाचा निरोप घेतला. मागे ब-याच आठवणी ठेवून, भारताचे नाव उज्ज्वल करुन आज ह्या महान शास्त्रज्ञाला निरोप देतान मन गदगदून आलं आहे.

डॉ. कलाम ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

प्रणिल टाकळे