सन्मान महिलांचा....

     स्त्री.. महिला..नारी...

           स्त्री म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती आपली प्रत्येकाची जन्मदात्री आई. जिच्यावर अगदी प्रत्येकाचे प्रेम हे असतेच असते. आणि तिचे ही आपले तिच्यावरच्या प्रेमाच्या शंभर पट अधिक प्रेम आपल्यावर असते. तिचे प्रेम कधी अबोल तर कधी स्पष्ट असते. कधी प्रेमळ तर कधी कठोर असते. कधी लाघवी तर कधी कणखर बनते. ह्या सर्व तिचे वेगवेगळे वाटत असले तरी आपल्या मुलांवर नितांत प्रेम असतेच. मग ते बाळ हुशार असो की कमी हुशार. मस्तीखोर मुलांनाही तिचे केले जाणारे प्रत्येक शासन प्रेमाची दुसरी बाजू दाखवणारे असते. अगदी लुळं-पांगळं बाळं ही त्या आईला तितकचं प्रिय असतं हे कधीच विसरुन चालणार नाही.
 
           स्त्री हे असं एकच अशी आहे जिला एका लग्नानंतर अनेक नाती आपसुकच जोडली जातात. आधी फक्त मुलगी, बहिण असणारी मुलगी नंतर पत्नी, सून, नातसून, वहिनी, मामी, काकू, नणंद अशा अनेक नव्या नात्याने क्षणार्धात नटते आणि तेच कालांतराने तिचे वैभव, विश्व सर्वकाही बनते. प्रत्येक सामान्य स्त्रीकडे नेहमीच एका पुरुषापेक्षा  क्षमता, काम करण्यासाठी लागणारी एकाग्रता, नवीन शिकण्याची चिकत्सक वृत्ती, लहानांतलहान गोष्टीचा आनंद करण्याची इच्छाशक्ती, पुरक शिक्षण मिळाले तर ते मनापासून आणि शक्य तितकं घेण्याची ताकद असे अनेक  गुण असतात. प्रत्येक स्त्री हे तेवढीच सहनशक्ती असल्याचे समीकरण परमात्म्याने बनवले आहे.
 
            आज आपण पाहतोय की स्त्रियांच्या शिक्षणात वाढ झालेली आहे. अनेक उच्च पदांवर फार पुर्वीपासून स्त्रियांना अमुल्य ठसा पृथ्वीतत्त्वावरच नसून अंतराळातही उमटवला आहे. एक साधारण गृहिणीही एका नोकरी करणा-या स्त्रीपेक्षा तितकीच कामात चणाक्ष आणि कार्यरत असतेच. म्हणतात देश चालवणेे आणि घर चालवणे, हे एकत्रितपणे एका स्त्रीला जमू शकत नाही. पण एक स्त्री एकाच वेळेला घर, ऑफिस, कुटुंब, समाज आणि स्वतःची काऴजी कशी लीलया घेऊ शकते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे किंबहुना आजही पाहत आहे.
 
           हल्ली वाढत्या जगात अाज अनेक स्थरांवर स्त्रियांचे स्थान आहे. तरी आजच्या घडीला स्त्रियांना आधीपेक्षा मोकळीक जास्त जरी मिळत असली तरी त्यांना कुठेतरी स्वतःचे वेगळेपण जपू देण्यास काहीच हरकत नसते. माझा असा उद्देश नाही की स्त्रियांनी सर्व मर्यादा सोडून समाजात वावरावे. पण प्रत्येक स्त्रिलाही मन असतंच हे प्रत्येकाने विसरुन चालणारचं नाही.
 
           हल्ली काही दिवसांपुर्वी "पोस्टर गर्ल" चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात अभिनेत्री सोनालीने खूप सुंदर भुमिका वठवली आहे. ती ज्या गावात जन्माला येते त्या गावात मुली जन्माला आल्यावर त्यांना व त्या बाळंतिणीला गावाबाहेर घरची मंडळी काढत असत. त्या प्रत्येक मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतं. मुख्य म्हणजे अशा परिस्थितीत त्या मुलीच्या पतीने पुढाकार घेतला जायला हवा होता. पण तसे झाले नाही. त्या गावात फक्त मुलगाच जन्माला यावा, ही लग्न होण्याआधीच आडकाठी करताना पाहयला मिळते. मात्र अभिनेत्रीने हे चित्र बदलवल्याचे चित्र आपल्याला मध्यांतरानंतर पाहायला मिळते. स्त्री ही सुरुवातीला मृदुच असते पण एका मर्यादेनंतर तिला महिषासुरमर्दिनी सारखे रणरागिणी स्वरुप घ्यायला भाग पाडणारे अशुभच असते.
 
          स्त्री-भृण हत्या हा खूप मोठा गुन्हा आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्याबाबतीचे अनेक गुन्हेगार डॉक्टर, पालक पकडले गेल्याचाही खूप अभिमान वाटतो. काही भागात आजही हा प्रकार चालत आहे. पण मला ह्या गोष्टीची खंत वाटते की कालांतराने त्या भागातल्या मुलांना रक्षाबंधन, भाऊबीज सारखे सण साजरे करता येतील का? भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिला उच्च स्थान दिले गेलेच आहे. पण कधी कधी खंत वाटते की हे फक्त दिखाव्या पुरतीच असते का? असे असेल तर तसे करणं किती चुकीचे आहे, हे कळल्या वाचून राहणार नाही.
 
          आज प्रकर्षाने काही ठिकाणी काही मुले आपल्या आई-वडिलांना म्हातारपणात वृद्धाश्रमात ठेवतात कारण त्यांना त्यांच्या "हायटेक" आयुष्यात त्यांची लुडबुड नको असते. त्यांच्या  So called स्टेटसला ते रुचणारं नसतं. पण आधी त्याच आईने आपल्या पोटाची आबाळ करुन त्यांच मुलाला वाढवलेले मोलाचे क्षण तो मुला विसरला का? शेवटी प्रत्येक आई ही क्षमाशीलच असते. त्यामुळे ही मानवी आई नक्कीच त्या मुलाला क्षमा करेल. पण... ती जगतजननी.. "दुर्गा"...? ती क्षमा करेल का? नक्कीच उत्तर नाही हेच असेल. पण ही जाणिव शेवटी होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मग त्याचा पश्चाताप करत बसण्यात अर्थ नसतो.
 
           काही दिवसांपुर्वी आपल्या मुळ मातेला, महिषासुरमर्दिनीला अपशब्द उच्चारण्यात आले. आज मनात खूप क्रोध आहेच कारण ज्या भारत संस्कृतीमध्ये स्त्रिला अनन्य साधारण मान आहे, त्याच भूमीवर जिने ही सृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला, तिलाच वाईट शब्दांत बोलताना बोलणा-याची जीभ झडली नाही? आज अनेक भारतीयांच्या मनाला टोचणारी ही गोष्ट घडली आहे. त्याबाबतीचा क्रोध अनेक प्रसार माध्यमाद्वारे अनेकांनी केला सुद्धा. पण मला त्या आदिमातेला सांगायचे आहे, आणि महिषासुराचाही अहंकार वाढलेला होता. त्यानेही तपश्चर्या करताना फक्त स्त्री सोडून इतर सर्वांकडून मृत्यू न यावा हा वर मागितला होता. त्याने त्यावेळीही स्त्रीशक्तीला पुर्ण ओळखले नव्हते. आणि आजही तुझ्यावर लांछन लावणारे बहुदा हे विसरले आहेत की तु क्षणार्थात सर्व असूरांचा नाश करण्यास तत्पर आहेस. आणि तुझ्या इतर देवी शक्तीही.
 
           एक लक्षात ठेवलं पाहिजे की जशी प्रत्येकवेळी महिषासुरालाही सुधारण्याची एक संधी आदिमाता दुर्गा बहाल करते तशीच प्रत्येक सामान्य स्त्रीही अन्यायाविरुद्ध लढण्याआधी शांत राहते, सहन करते. शस्त्र उगारण्याआधीही शंभरदा विचार करतेच. पण जेव्हा पावित्र्य संपुन अधर्मी आगेकुच करतो तेव्हा ती निर्मळ मनाची सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कुटुंबरक्षणासाठी कधी राणी लक्ष्मीबाई तर कधी अष्टादशभुजा "दुर्गा" बनून अशुभाचा नाश केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही.

          आजच्या घडीला आपल्याला आपल्या घरापासून महिलांचा आदर सुरु केला पाहिजे. महिलांना भक्कम पाठिंबा, आधार दिल्यावर सामान्य स्त्रीदेखील जग घडवू शकते, ह्यात तीळमात्र शंका नाही.

           
स्त्री जन्मली..
ती उदयास आली..
प्रगतीची उंच शिखरे तिने,
आपल्या कलागुणाने चुंबली...१

अनन्य साधारण महत्त्व
आहे स्त्रीचे ह्या जगती
अन्यायाविरुद्ध ती सत्वर
क्रोधायमान मग होती...२

महिलांना प्रोत्साहन द्या,
तिला नव्याने पुन्हा सजवा,
तिच्या नव्या यशात मग,
आपलाही आनंद मिळवा...३

महिलादिन रोज व्हावा,
महिलेला नवा मार्ग गवसावा,
आदिमातेच्या चरणी तिच्यासाठी,
 सादर साष्टांग अर्पवा...४

प्रणिल टाकळे