सैराट.... झालंं जी.....
          
                 ब-याच दिवसांपासून अगदी सर्व सोशल साईटस्, टिव्ही, पोस्टर अशा सगऴ्या ठिकाणी फक्त एकच सुरु होते.."सैराट....."
       
                ह्या नव्या येणा-या चित्रपटाविषयी सर्व बाजूने Campain केले जात होते. प्रत्येकाच्या मनात, विचारात, मुखात फक्त ह्या चित्रपटाविषयी उत्सुकता दाटली होती. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या पहिल्या शोचे तिकीट काढले जात होते.
   
               असाच माझ्याही आयुष्यात हा चित्रपट पाहण्याचा योग सहकुटुंब जुळून आला. सुरुवातच एका खेळकर, विनोदी क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या निवेदनाने झाली. कानात शब्द पडत होते आणि चेह-यावर हसू उमटले जात होते.
   
                सैराट...................सुरु झाला आणि त्यात सर्व स्वत:चे भान हरपून मी पाहत होतो. नुकत्याच वयात येणा-यांचे कोवळे प्रेम नागराज मंजुळेंनी अतिशय नाजूकरित्या चितारले आहे. लहान वयातला अल्लडपणा आणि त्यांच्या वयात असणारी पहिल्या प्रेमाची जिद्द, ज्यात सर्वकाही आहेच, अशी पुर्ण खात्री असणारी जोडी... परश्या आणि आर्ची.. खूपच मनाला भावली.
    
                  परश्याची चित्रपटामधली एन्ट्री, त्यांचं आर्चीवरची सुरुवातीचे एकतर्फी प्रेम, त्यांतही त्यांनी जपलेले त्यांचे कविता लिहीण्याचे, क्रिकेट खेळणे, पोहणे, असे अनेक छंद खूप सुंदररित्या वठवले आहेत तर आर्चीची बिनधास्तपणे जगण्याची, पाटलांची मुलगी असण्याचा रुबाब, बुलेट चालवतानाचा ताठा व ट्रॅक्टर चालवतानाची ऐट, तिचे ठसक्यात बोलण्याचे भाव, अल्लडपणे वावरणं, असं सगळंच मनात घर करुन आहे.
  
                "अययययय....तुला मराठीत सांगितलेलं कळतं नाही?? की इंग्लिशमध्ये सांगू???" हे वाक्य चेह-यावर हसू आणल्याशिवाय राहत नव्हते.
    
                प्रेमात बेधूंद झाल्यावर पी.टी. च्या तासाला परश्या व आर्ची वेगऴ्याच धुंदीत पहायला मिळतात, तर धावत्या रेल्वेच्या आवाजावर नाचणारे परश्या आणि त्याचे दोन मित्र सलीम आणि प्रदीप(लंगड्या) प्रेक्षकांना खो-खो हसवून गेले.
    
               आर्ची गावाच्या नावाजलेल्या कुटुंबाची मुलगी आणि परश्या एक कमी दर्ज्याच्या मासे पकडणा-या कुटुंबातला मुलगा असतो. मात्र प्रेमाला कसल्याच प्रांताची, जातीची सीमा नसते. ते एकमेकांच्या मनाला स्वीकारल्याने स्वतःच्याही नकळत होऊन जाते, कळतचं नाही. तसेच काहीसे परश्याच्या एकतर्फी प्रेमाचे रुपांतर ख-या प्रेमात होते. आर्चीचीही त्यात एकमताने संमती असते.

"याडं लागलं गं याडं लागलं रंऽऽऽ
   रंगलो तुझ्यात याडं लागलं रंऽऽ
वास येई ह्या ऊसात कस्तुरीचा,
  चाखलं रं वारं ग्वॉड लागलं रं...."
  

                   ह्या गाण्याने खूप सुंदर मौहोल तयार केला. मनात ह्या गाण्याने एक वेगळेचं स्थान ग्रहण केले आहे. प्रेमात रंगून गेलेल्या दोघांना इतर परिस्थितीची अजिबात काही पडलेली नसते, आणि ते फक्त आपल्याच वेगळ्या विश्वात रममाण असतात, हे ह्या गाण्यात आपल्याला पाहताना रंगून जायला होते.
     
            प्रेमात पडल्यावर आर्चीसाठी स्वतःला बदलवणारा परश्या छान वाटतो.
    
 ...... "आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधून,
        तुझ्या नावाचं मी Initial टॅटूनं गोंदलं..."
      
              मनाला, पायांना बसल्या जागीच थिरकायला लावणारं हे गीत तर प्रत्येकाचं आवडलं बनलं आहे. अनेकांच्या मोबाईलच्या रिंगटोन ह्या सेट झाल्या आहेत. ह्या गाण्यावर काही चित्रपट गृहात प्रेक्षक नाचतात,
ह्यावरुन आपण ह्या गाण्याची क्रेज किती आहे, हे समजू शकतो.
     
              शेवटी आर्चीच्या घरी ह्यांच्या प्रेमाविषयी कळते आणि ते आर्चीला घरात कोंडून ठेवतात व परश्या आणि त्याच्या दोन मित्रांना बेदम मारतात. पण प्रेमात ते सर्व सहन करण्याची ताकद ह्या दोघांकडे होती.
    
               घरातून सर्व बाजून विरोध होऊन पण परश्या आणि आर्ची स्वतःच्या प्रेमावरुन तसूभर पण ढळलेले दिसले नाहीत. त्यांच्यावर अनेक संकटे येऊनही त्यांनी त्यातही स्वतःची साथ न सोडण्याची व लढत पुढे जात राहण्याची शपथ खूप आधीच घेतलेली, असं पदोपदी पटतं. ह्या त्यांच्या संघर्षात परश्याच्या दोन्ही मित्रांनी त्यांना खूप मदत केली. जीवाला जीव देणा-या मित्रांचे हे त्रिकुट पाहताना मलाही माझ्यासाठी माझ्या लहान सहान गोष्टीत मदत करणारे मित्र माझ्या डोळ्यासमोर तरळले.
       
                सगळ्यापासून दुर जाण्याचा निर्णय घेऊन परश्या व आर्ची हैद्राबादमध्ये जाऊन पोहोचतात. त्यांना एकटे आणि तसे लहानचं असल्याचे पाहून काही वाईट मुले त्यांना त्रास द्यायला लागतात. पण शेवटी परमेश्वारच्या दरबारात चांगल्या व्यक्तीवर कधीच तो परमेश्वर जरासेही वाईट येऊ देत नाही. व तो स्वतः आपल्या चांगल्या माणसांचे रक्षण करायला कोणाला तरी पाठवतोच. तिथेही सुमन अंटीच्या रुपात अनोळखी शहरात परश्या व आर्चीला राहण्यासाठी लहान घर, खाण्यासाठी अन्न, हळूहळू दोघांनाही नोकरी मिळाली. सुमन अंटीनेच त्यांचे लग्न लावून दिले. दोघांनाही एक सुंदर मुलगा होतो. दोघांचा मिळून ४०हजार महिना पगार ही होतो. सर्व अगदी सुरळित सुरु होते. ते तिघे खूप आनंदाने राहत होते.
     
               ...आणि एकदा आर्चीच्या घरी हैद्राबादला तिचा भाऊ प्रिन्स व इतर भाऊ त्यांच्या लहान मुलासाठी कपडे व खेळणी आणतात. व आर्चीला सांगतात आईने पाठवले आहे. आर्ची खूप खुश होते. मनात एकचं वाक्य म्हणतं असते.... "आता सगळं छान होणार....". त्याच आनंदात ती हे सर्व परश्यालाही सांगते. आणि त्या दरम्यान त्यांचा मुलगा बाहेर गेलेला असतो. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले अचानक समोर येते.
        
                  त्यांचा लहान २ वर्षाचा बाळ आत त्या दोघांना शोधत येतो. आणि पाहतो तर काय आर्ची व परश्या रक्तांच्या धारोळ्यात पडले आहेत. त्या लहान मुलाच्या त्या सिनमध्ये आवाज कसलाच नाही. आजूबाजूला निरव शांतता. प्रेक्षकही सगळे अचानक समोर आलेल्या त्या प्रकारामुळे क्षणभर स्तब्ध झालेले. पडद्यावर आणि चित्रपटगृहातली ती भयाण शांतता हृदयाच्या आरपार गेलेली. तो प्रसंग पाहताना मनावर जोरदार झालेल्या आघातामुळे त्याचे ओझे मोकळे करण्यासाठी डोळ्यांचा बांध फुटला आणि अखेर सर्व अवसान गळून त्या केविलवाण्या लहान मुलासाठी मन गहिवरुन रडू आवरेनासे झाले.
     
                 मला असं वाटतं, आता जग ब-यापैकी बदलले आहे, तर त्या बदलत्या जगानुसार जातीभेद काही कारणास्तव दूर ठेवून आपल्या मुलांचे सुख कशात आहे, ह्याचा जरूर विचार नक्कीच करता येतो. मुलं खूश तर त्यांचे पालक खुश असं मला वाचतं. जातीभेदाच्या, सुडाच्या नावाखाली पोटच्या मुलांची हत्या करणे, म्हणजे असह्य आणि प्रमाणाबाहेरची चूक आहे.  आर्ची आणि परश्या दोघेही चांगल्या कंपनीत भरपुर असे कमवून स्वतःच्या पायावर उभे होते, तेही स्वतःच्या मेहनतीने. मग केवळ स्वतःच्या नावासाठी, सुडासाठी आर्चीच्या भावानेच त्यांना मारले, हे न पटण्यासारखे आहे. ते करताना माणुसकीच्या दृष्टीने त्यांच्या लहान मुलाचा तरी विचार करता आलाच असता. जे गेलं ते विसरून जावूनही त्यांच्या सुखी आयुष्याला अजून फुलवता आलं असतं.
    
                    शेवटी जरी हा चित्रपट असला तरी अशा काही भागात अशा घटना आजही घडत आहेत. अशा प्रकारचे निर्घुण कृत्य करताना आपल्या जीवाला जीव देणा-या नातेवाईकांचा हसरा चेहरा नक्कीच समोर आणावा.
      
                  मनापासून सांगतो, चित्रपट खरचं नजर लागण्यासारा आहे. प्रत्येकाने बघावा असा हा सैराट... पुन्हा बघितल्याशिवाय कोणीच शांत राहू शकणार नाही, ह्याची खात्री एक प्रेक्षक म्हणून देतो.
      
                राष्ट्रीय पुरस्कारासाठी ह्या संपुर्ण चित्रपट संघाचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्रणिल टाकळे