पुस्तक प्रकाशन -एक अविस्मरणीय संध्याकाळ


                 "पुस्तक प्रकाशन" हे आज पर्यंत ऐकून होतो. म्हणजे टीव्हीवर किंवा वृत्तपत्रामध्ये कोणा ना कोणा लेखक-लेखिका, कवी-कवयित्री ह्यांचे लेख संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाले असे समजायचे. कधी असा मोठा कार्यक्रम पाहिला नव्हता. तर त्याचे निमंत्रण असणे लांबची गोष्ट आहे. कारण ज्यांचे हे असे पुस्तक वगैरे प्रकाशित होतात त्यांचा स्वतःचा आधी गाढा अभ्यास असतो आणि त्या कार्यक्रमाला आलेल्या मंडळींना त्या त्या विषयाची सखोल माहिती असते. अश्या व्यक्तींना साधारण निमंत्रण मिळते अशी साधी कल्पना आजवर मनात होती. इच्छा मात्र होतीच कि कधी आपण अश्या कार्यक्रमाला जाऊ शकतो का?

                 शेवटी म्हणतात, इच्छा चांगली असली तर तो परमात्मा आपल्याला त्याचे फळ देतोच. आणि ते देताना काहीच तो हातचं राखून ठेवत नाही. 

                     एके दिवशी दुपारी ऑफीसमध्ये काम सुरु असताना एक फोन आला. "हॅलो, प्रणिल का? तुम्हाला २६जून २०१७ रोजी संध्याकाळी लोटस पब्लिकेशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या दोन पुस्तकांच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण करण्यासाठी हा फोन आहे". आधी काही कारणास्तव हा आलेला फोन माझ्या पर्यंत पोहोचला नव्हता. शेवटी त्याच अफाट प्रेमाचा स्त्रोत असलेल्या भगवंताने पुन्हा हा फोन माझ्या पर्यंत येऊ देऊन ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. फोन ठेवला तेव्हा क्षणभर काहीच सुचत नव्हते कि हा फोन आपल्याला येण्याचे कारण कोणते? किंवा आपण तर देत असलेल्या कमी योगदानाच्या बदल्यात हे दान मिळणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. तरी काही तरी त्याच भगवंताची कृपा आहे, हे जाणून घेतले. (प्रत्येक वेळी सर्व श्रेय भगवंताला दिले तर त्याची सर्व पुढची वाटचाल 'तोच' परमात्मा करतो म्हणून त्याच्यावर पूर्णतः आपले जीवन सोपवून आपले कार्य चालू ठेवावे, हि सुद्धा त्यांचीच शिकवण आहे).

                   ही संध्याकाळ खूप वेगळी असणार ह्याची कल्पना आधीच होती पण तरीही त्या अभूतपूर्व आणि पहिल्यांदाच अनुभवता येणाऱ्या ह्या पुस्तक प्रकाशन संध्येची मी वाट बघत होतो आणि ती संध्याकाळ आली. 'राजा शिवाजी विद्यालय' अनेक वर्षांपासून बघत आलो आहे. त्या शाळेलाच एक असं वेगळेपण आहे कि नुसतं नाव जरी समोर आलं तरी त्याविषयी आदर वाटतो. माझ्या पदव्युत्तर शिक्षणाला(M.Sc. Computer Science)साठी मी ह्या शाळेच्या नजीकच असलेल्या रामनारायण रुईया महाविद्यालयात होतो. तेव्हा अनेकदा ह्या शाळेसमोरून आम्ही सर्व जात असू आणि लहानपणी अल्फा मराठी(सध्याचे झी मराठी)वर अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे "दे धमाल" मला आवडायची आणि त्या मालिकेचे चित्रीकरण ह्याच शाळेत केलेले होते. तेव्हा पासून ह्या शाळेचे आकर्षण होते आणि ह्या निमित्ताने ते पूर्ण झाले. तसेच श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट तर्फे राबविण्यात येणाऱ्या कोल्हापूर मेडिकल कॅम्पसाठी उपयुक्त असलेला "ओप्टोमेट्री"चा (डोळे तपासणीचा) कोर्स हि ह्याच शाळेत झालेला. आणि आज पुन्हा ह्याच शाळेच्या प्रांगणात असलेल्या प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात हा सोहळा होणार हे ऐकल्यावर सर्व पुन्हा आठवले आणि अधिक आनंदाने ह्या सोहळ्याच्या स्थळी पोहोचलो.

                  तिथे पोहोचताच क्षणी अनेक माझे मित्र-मैत्रिणी भेटल्या आणि ह्या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या एकमेकांच्या वेगवेगळ्या reactions पाहण्यात आनंद द्विगुणित होत होता. काय नक्की असेल ह्या दोन पुस्तकात आणि कशा संदर्भात असेल ह्याची कुतुहलता मनात कल्लोळ करत होती आणि रंगमंचावरचा पडदा हळुवारपणे बाजूला सारला गेला आणि त्यावर सर्वांचे लाडके अभिनेते श्री सचिन खेडेकर होते.त्याच्या बाजूला ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते त्या आशालताताई वाबगावकर आणि डॉ. वसुधाताई आपटे होत्या. तर दुसऱ्या बाजूला निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण सर दीक्षित आणि त्याच्या बाजूला "लोटस पब्लिकेशन"चे एम.डी. समिरसिंह दत्तोपाध्ये होते. आणि ह्या सर्वांच्या बरोबर रंगमंचावर ह्या विश्वाची जननी आदिमाता महिषासुरमर्दिनीची मनोहारी तसबीर होती. कार्यक्रमाची सुरुवातच आई जगदंबेच्या सुंदर "श्री शुभंकरा स्तवना"ने झाली. वातावरणात एक विलक्षण अशी सुमधुरता आली आणि मग निवेदकांनी त्यांच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले.


                    सर्वांत आधी रंगमंचावर असलेल्या प्रत्येक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि लोटस पब्लिकेशनच्या भाग असलेल्या कल्पना नाईक ह्यांनी लोटस पब्लिकेशन आणि "प्रत्यक्ष"ने आजवर केलेल्या वाखाण्याजोग्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने त्यांनी ह्या वृत्तापत्राचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी लिहिलेल्या "तिसरे महायुद्ध" ह्या लेखमालेचा उल्लेख केला. तसेच काही दिवसांपूर्वी ह्याच संस्थेने प्रकाशित केलेल्या "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले हेही सांगितले.



                      मग ह्या दोन्ही पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. पहिले पुस्तक म्हणजे "गर्द सभोवती". त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाला पाहताच क्षणी कळले की आशालताताईंच्या "गर्द" हिरव्यागार मनाने, हृदयाने अनुभवलेल्या अनेक निरनिराळ्या अनुभवाची सुंदर लेखमाला असणार आहे. आणि त्या वाचल्याने आपल्या जीर्ण- थकलेल्या मनाला नवीन तजेला मिळणार आहे एवढ मात्र नक्की. आजवर आशालताताईंना मी चित्रपट, नाटक, मालिका ह्यातच पहिले होते. मात्र "प्रत्यक्ष- बिगर राजकीय दैनिक" ह्या वृत्तपत्रामध्ये त्यांचे आलेले ललितलेख वाचले आहेत. आणि एवढ्या आपल्या वयालाही लाजवेल असल्या आशलताताई ह्या वयात अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचे लिखाण सुरूच ठेवत आहेत. 

                   

                     ह्या पुस्तकाची प्रस्तावना आजचा आघाडीचा नट सुबोध भावे ह्यांनी लिहिलेली आहे. आणि आशालता ताई ह्यांना त्याच्या माँ बोलण्यातच सर्व काही त्याचा त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम दिसून येते. 

 
                   दुसरे पुस्तक म्हणजे "गुन्हेगारांचे कर्दनकाळ" आणि त्याच्या लेखिका आहेत डॉ. वसुधाताई आपटे. "फॉरेन्सिक लॅब" म्हणजे गुन्हेगारांच्या त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर केले जाणारे आणि त्या गुन्ह्याच्या खोल जात येण्यासाठी केले जाणारे प्रयास म्हणजे न्यायवैद्यकशास्त्र. हे आजवर आपण टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका CID मध्ये पाहिले आहे पण ह्याच विषयाचा अभ्यास केलेल्या वसुधाताईंनी ह्या पुस्तकात त्यांनी ह्या संदर्भात असलेल्या समज-गैरसमज ह्याला जागा उरू न देण्याचे उत्तम कार्य कसे केले ह्याची नोंद आहे. आणि ह्या पुस्तकाची प्रस्तावना ह्या कार्यक्रमाला आलेले 
निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण सर दीक्षित ह्यांनी लिहिली आहे. 




                    अभिनेते सचिन खेडेकर ह्यांनी दोन शब्दांत जेव्हा ह्याविषयी सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मनातली वाचनाकडे कमी प्रमाणात वळणारी माणसे ह्या नव्या धाटणीच्या पुस्तकामुळे तरी पुन्हा जोमाने येतील अशी खात्री वाटली आणि त्याविषयी त्यांनी त्यांच्या भाषणात नमूदहि केले. 

           तसेच डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांच्या नायर हॉस्पिटलमध्ये त्या वेळी कार्यरत असलेल्या आणि फॉरेन्सिक मेडिसिन ह्या विषयांच्या प्रमुख असलेल्या डॉ. वसुधाताई ह्यांच्याविषयी मनभरून लिहिले आहे. त्यात ते आवर्जून सांगतात की त्या एक अश्या शिक्षिका होत्या ज्यांनी हा विषय समजण्यास किचकट असूनही तो कशाप्रकारे सोपा करून सांगितला आणि त्यांना काही doubts विचारताना कोणालाही भीती वाटायची नाही. कारण त्या मुळातच प्रेम, विद्यार्थ्याविषयीचे वात्सल्य आणि उत्तम शिक्षिका ह्याचे एकत्रित समीकरण होते.




                     आशालताताईंच्या ह्या पुस्तकाविषयी त्यांनी बोलताना म्हटले की ह्यांची हि नवी बाजू पाहताना आणि तेही पुस्तक रूपात आल्याचे बघताना आनंद होत आहे. आणि जवळ जवळ ५० वर्षांपूर्वी न्यायवैद्यकशास्त्राचे शिक्षण एक महिला घेऊन त्यात ३५ वर्षे अविरतपणे आपले कार्य केले ह्याचा आढावा घेताना डॉ. वासुधाताईंचा उल्लेख मानाने घेतला कि त्याकाळीही त्यांनी हे शिक्षण घेतले हि अभिमानास्पद गोष्ट आहे. 
                    दोन्ही लेखिकांनी जेव्हा त्यांचे मनोगत काही शब्दांत व्यक्त केले त्यात एक वाक्य प्रामुख्याने जाणवत होते की त्यांच्या ह्या मोठ्या कारकीर्दीनंतर "प्रत्यक्ष" सारख्या वृत्तपत्रामध्ये लिहीण्याची संधी दिली आणि सर्वात जास्त विश्वास ज्यांनी ठेवला त्या "प्रत्यक्ष"च्या कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. डॉ. वसुधाताई आपटे ह्यांचे डॉ. जोशी हे नायर हॉस्पिटलमधील विदयार्थी होते तर आशालताताईंचे डॉ. जोशी हे मार्गदर्शक गुरु आहेत. दोघींनी डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी त्यांना केलेल्या सक्रिय पाठिंब्याचे न विसरता आणि आवर्जून भाषणात समावेश केला. 

                            

 
      


                    सर्वात पर्वणीची गोष्ट म्हणजे सोहळयाची सांगता झाल्यावर रंगमंचावर दोन्हीं लेखिका त्यांच्या लिखित पुस्तकावर त्याची स्वाक्षरी देण्यास न कंटाळता बसल्या आणि त्यांनी अगदी सगळ्यांना स्वाक्षरी दिली. मनात हा क्षण समावताना मन हिंदोळे घेत होते आणि हा दिवस आयुष्यात सोनेरी अक्षराने कोरला जात होता. पण ह्या अश्या सोहळ्याचा भाग होता येईल असे कधीच वाटले नव्हते. मात्र "प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक" आणि "अनिरुद्ध कलादालन"नी हि संधी माझ्या आयुष्यात दिली ह्यात मी मला धन्य मानतो. 


आता तर आपण ऑनलाईन सुद्धा ह्या पुस्तकांचा आपण लाभ घेऊ शकतो.

"गर्द सभोवती" लेखिका- आशालता वाबगावकार

https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GRSMDL

"गुन्हेगारांचे कर्दनकाळ"- लेखिका डॉ. वसुधा आपटे

https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL

प्रणिल टाकळे