अनुभवाचे बोल...



                 आयुष्य हे आपल्या प्रत्येकासाठी जणू अनुभवांची मालिकाच असते. ज्यात आपल्याला कधी कधी असे अनुभव येतात ज्यांचा आपण विचार पण केलेला नसतो. तर कधी असे अनुभव येतात कि आपल्याला त्याविषयी काहीशी पुसट अशी कल्पना असते.  अनुभवांतून माणूस शिकतो असं म्हणतात तेसुद्धा खरच आहे. कोणीही जन्माला येताना काहीच शिकून आलेला नसतोच. हळू हळू मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन शिकायला मिळते आणि त्याच शिकण्यातून अनुभवांची शिदोरी मिळत जाते. हि शिदोरी कधीच कोणीही कोणाची चोरू शकत नाही. कारण प्रत्येकजण हा आपल्या जीवनाचा शिल्पकार जसा असतो ना तसाच तो आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी पाहत असतो, करत असतो आणि त्यातून नवीन शिकतच असतो.

               कधी आपण म्हणतो  कि मला हि गोष्ट करायला येत नाही किंवा जमत नाही. पण आधीच आपण एका कामासाठी नकार घंटा लावली तर ती गोष्ट होणारी असेल तरी आपल्या मनात भीती असल्यामुळे किंवा कधी दडपण असल्याने ते काम आपण योग्य प्रकारे करू शकत नाही किंवा त्यात चुका होत राहतात आणि त्यावेळी आपण त्या गोष्टीला योग्य तो न्याय देण्यासाठी असमर्थ ठरतो. मग ह्या साठी काय केलं पाहिजे तर सर्वात आधी आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे. "नदीत पडल्याशिवाय पोहायला येणार नाही".म्हणजे जर मी नीट मनापासून प्रयास केले तर ते नक्कीच पूर्ण होतात. कारण ते करण्यासाठी आपण आधी त्यासाठी नीट planning करत असतो आणि त्यासाठी ते योग्यरीत्या कसे पूर्ण होईल त्यासाठी धडपडत असतो. मग ते काम पूर्ण होतेच. आधीच मी म्हटले कि हे काम होणारच नाही तर कस चालेल? त्यासाठी आधी कोणतेही काम करताना ते ज्यांना कोणाला येत असेल त्यांच्या कडून माहिती घेऊन ते कसे करता येईल ह्याची मांडणी करूंन घेण्याची आणि मग ते आपल्या प्रयासातून उतरवायचे. मी चुकेन असे मनात ठेवले तर चूक होईलच. आणि आपल्याला आपल्या कामावर जम बसणार नाही.

                कोणत्याही गोष्टीत आधी आपण फ्रेशर असतो आणि मग नंतर हळूहळू आपल्याला त्यात experience येतो आणि तो वाढत जातो. आणि हाच अनुभव मग आपल्याला अनेकदा काही क्रिटिकल काम असेल त्यावेळी उपयोगाला येत असतो आणि आपली प्रगती होत जाते. मग इथे आपण हि आपल्याला आलेले अनुभव नेहमी इतरांना सांगून आपल्या ज्ञानांची वाटणी करताना पुढे मागे पाहू नये. कारण ज्ञान वाटल्यानेच ज्ञान वाढते. त्यातूनही हि अनुभव येत जातो आणि आपल्याला इतरामुळे आणि इतरांना आपल्यामुळे नवीन शिकायला मिळते. 

                  कधी माणसं ओळ्खताना कि आपण अनुभव नसल्याने चुकतो पण तरीही त्यातही कालांतराने आपल्याला ह्यातही अनुभव येतोच आणि मग एकदा का तो अनुभव आला कि मग आपण पुढच्या वेळेला "ताक सुद्धा फुंकर मारून पितो", त्यानुसार माणसं ओळखायला लागतो आणि मग ती समाज सुद्धा हळू हळू आपल्याला मनाशी दृढ होत जाते.

                अनुभव आणि त्यातून मिळणारी शिकवण जरी आयुष्यभराची आपल्याला शिदोरी देऊन जाते, तिची सांभाळ करून त्या अनुभवांना जपून ठेवून, मनात कधीच कोणाविषयी काहीच ऊण-धुणं ना ठेवता आपला प्रवास चालू ठेवून नव्या अनुभवना सामोरे जात राहायचे कारण ह्यालाच तर जीवन म्हणतात. 

प्रणिल टाकळे