अभूतपुर्व अनूभव-

कोल्हापूर वैद्यकिय शिबिर २०१६

          
              आजपर्यंत मी कोणताही वैद्यकिय शिबिर पाहिला नव्हता आणि त्यात कार्य करणे तर दुरचं राहिले. ब-याच वेळेला कानावर वेगवेगळ्या वैद्यकिय शिबिरांविषयी ऐकले होते, मात्र गेलो कधूच नाही. पण "सदगुरु अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन ट्रस्ट", ह्याच्या "कोल्हापुर वैद्यकिय शिबिरा"चे नाव ऐकले आणि ह्या शिबिराला भेट देण्याची इच्छा मनात खोलवर घर करुन राहिली. 
   
           साधारणत: वैद्यकिय शिबिर म्हटले की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मेडिकल चेकअप, औषधे वगेैरे. पण त्याहीपेक्षा "कोल्हापुर वैद्यकिय शिबिर" वेगळं असतं, हे आधी फक्त ऐकून होतो. मात्र २०१६ च्या ह्या शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी माय चण्डिकेमुळे मिळाली, त्यासाठी मी "ती"चा कृतज्ञ आहे. 
        
        फेब्रुवारीच्या २०, २१, २२ ह्या तीन दिवशी ह्या शिबिराचे आयोजन कोल्हापूरमधील ३०-३५किमी आत "पेंडाखळे" गावी करण्यात आले होते. ह्या शिबिराची सुरुवात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी साधारण २००२-२००३ मध्ये "मेथी" ह्या अगदी लहान गावापासून केली. गेल्या ह्या १३ वर्षांमध्ये त्या गावांच्या शारिरीक परिस्थितीत जमीन-अास्मानांचा फरक नक्की पहायला मिळतो. 
     
          बरेच वैद्यकिय शिबिर आपण बहुदा सुखवस्तू शहरांमध्ये होताना पाहतो. मात्र ज्या भागात आणि ज्या लोकांना खरचं ह्या सर्व सुविधांची नितांत गरज आहे त्या ठिकाणी ह्या शिबिराची गरज खरी असते, हे आपल्याला ह्या शिबिरात गेल्यावर कळते. ह्या शिबिराची मनापासून वाट पाहणारे सर्व गावकरी स्वतःची दिड एकर जमीन शेणाने सारवून ठेवतात आणि ह्याची पुर्वतयारी ते सर्व गावकरी शिबिराच्या खूप आधीपासून करायला सुरु करतात. त्यासाठी स्वतःची शेतजमीन वापरण्यासाठी देतात आणि हे शिबिर पुर्ण होईपर्यंत शेती बंद ठेवतात. ह्या शेतक-यांच्या वर्तणुकीतून त्यांचा बहुमोलाचा "त्याग" प्रकर्षाने दिसून येतो.

       दोन प्रमुख भागांमध्ये विभागलेले हे शिबिर उत्कृष्टरित्या आखले होते.
त्यातला पहिला दिवस होता तो म्हणजे,

         "जूनं ते सोनं"... आता तुम्ही म्हणाल असं काय खास आहे ह्या दिवसांतलं.  सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सुरु केलेल्या 'तेरा कलमी योजना' मधील एक कलम म्हणजे "जून ते सोनं" योजना.

            ह्या आपल्याकडचे जूने कपडे, साड्या, पंजाबी ड्रेस, लहान मुला-मुलींची कपडे जमा करुन त्यांचे वाटप केले जाते. तसेच त्याच बरोबर पिण्याच्या पाणी शुद्धीकरण करुन पिण्यासाठी त्यात वापरण्याचे औषध आणि शेतात किंवा उन्हांत काम करून खरुज सारखे आजार होऊ नये ह्यासाठी शरीराला लावण्याचे औषध, दंतमंजन पावडरं, कपडे धुण्याची पावडर, स्त्रियांसाठी हिरव्या-लाल बांगड्या, टिकल्या, अंघोळीचा साबण, कंगवे, लहान फण्या, स्रियांनी शिवलेल्या गोधड्या, वयस्कर स्त्रियांना नऊवारी साड्या, जूनी भांडी ह्यांचे त्या त्या गावातल्या कुटुंबासाठी त्या घरानुसार एक एक गाठोडे तयार करुन त्या कुटुंबप्रमुखाला किंवा त्या घरातल्या मोठ्या व्यक्तिकडे दिले जात होते. लहान मुलांना खेळणी, विणलेले स्वेटर दिले जात होते. ते सगळं स्वीकारतानाचा त्या प्रत्येकांच्या चेह-यावरील आनंद अवर्णनीय होता.

             आता तुम्ही म्हणाल, ह्यातून आपण काय शिकलो???
तर ज्या कुटुंबाला मोठ्या मोठ्या कपड्यांची आस असूनही त्यांना मिळत नाहीत, आणि अचानक त्यांना जेवढ्या गोष्टी मिळाल्या ते पाहून त्यांचा आनंद आणि समाधानी चेहरा मनात साठवता आला. मनाची तृप्तता काय असते हे त्यावेळी पहायला मिळाले, हे एका लहान उदाहरणावरुन सांगतो.
          प्रत्येक गावातल्या कुटुंबानुसार त्या गावी जाऊन परीक्षण करुन त्या कुटुंबाना त्यांच्या नावाचे गाठोडे दिले जाते. त्यातल्या एका आजीबाईंच्या नावाचे गाठोडे त्यांना मिळाले नाही. तरी त्याच्या चेह-यावर "मला माझं गाठोडं नाही मिळालं तर मी भांडू" असा अजिबात लवलेश नव्हता. त्या आजींच्या पदरात दोन हात भरुन हिरव्या-लाल बांगड्यांचा मोठा गुच्छा दिला. तो पाहून त्यांच्या चेह-यावरचा आनंद, त्यांची तृप्तता आजही डोळे शांत बंद करुन आठवल्यावर डोळ्यांसमोर तरळते.
          
              ह्या सर्व गावातल्या ह्या प्रत्येकांना आता कोणती वस्तू कशासाठी वापरली जाते हे तोंड पाठ झालेले ऐकून खूप भरून येतं. गेली १३ वर्षे दरवर्षी हे शिबिर असते त्यामुळे प्रत्येक गावातले गावकरी आतूरतेने वाट पाहत असतात.  गेल्या १३ वर्षामधील फरक खूप अलौकिक आहे. आजार रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. अंध:श्रद्धेचे प्रमाण जणू नव्हत्यावर येऊन ठेपले आहे. ह्या सर्वांसाठी मोठ्या टेंपो, ट्रकमधून प्रवास करताना खूप वेगळा अनुभव घेता घेता नवीन शिकायला ही मिळाले. मुख्य म्हणजे दर तीन महिन्यांनी त्या प्रत्येक गावात ह्या सर्व वस्तूंचे वाटप विनामुल्य केलेच जाते.
       
             दुसरा दिवस म्हणजे मुख्यत्वे शिबिरासाठी असतो, ज्यात सर्व गावक-यांचे मेडिकल चेकअप केले जाते. गावागावांतून लहान,मोठे, वयोवृद्ध ह्यासाठी पेंडाखळे गावी येतात. सुरुवातीला आल्यावर प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना टोपी, चपला, दोन गणवेश, वीजेच्या अभावामुळे अभ्यास करता यावा ह्यासाठी "विद्याप्रकाश योजने" अंतर्गत मेणबत्ती आणि काडेपेट्याचा बॉक्स दिला जातो. येणा-या प्रत्येक गावक-यांचे पुर्ण चेकअप केले जात होते. त्यात मला "नेत्रतपासणी" भागात काम करायला मिळाले, त्यातून मला नवनवीन माणसांशी संपर्क आला. 


             
           बहुतांश गावकरी शेतात काम करतात, त्यांना लांबचं दिसण्याचा त्रास असतो. वयोमानानुसार हळूहळू जवळचं दिसण्याचाही त्रास स्त्रियांमध्ये दिसून येतो. बराच वेळ उन्हांत काम करुन आणि हवा तेवढा आराम न मिळाल्याने त्या गावक-यांमध्येे "मोतीबिंदू" असण्याचे प्रमाणही बरेच होते. त्या प्रत्येक गावक-यांच्या दृष्टीमर्यादेपर्यंतचा त्यांना त्यांच्या डोळ्यांचा नंबर काढून देण्यात येत होता आणि खूपच जास्त प्रमाणात त्यांच्या डोळ्यांचा त्रास असल्यास तिकडे उपस्थित डॉक्टर चा सल्ला घेऊन औषधोपचार करण्यात येतही होता.  त्या प्रत्येकांच्या चेह-यावरचा अतुलनिय आनंद जेव्हा त्यांना काहीच न दिसण्यापासून ते चष्म्याच्या मदतीने स्पष्ट दिसल्यावरचा काही औरच होता. त्या प्रत्येकांच्या मुखातून निघालेल्या समाधानकारक शुभेच्छा आणि त्यांच्या दिलेल्या आशीर्वादाने ऊर भरून आला. आणि समाधानही लाभले की आपल्या थोड्याशा मदतीने तरी त्यांना एक नवी दृष्टी मिळाली.

             सर्वांत महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या गावांतील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण खूप वाढले आहे, ह्याच्या उत्तम दाखला म्हणजे ह्या गावातीलच दोन विद्यार्थ्यांनी "होमियोपेथी" मध्ये शिक्षण पुर्ण करुन ह्याच शिबिरात डॉक्टर म्हणून आपल्याच गावक-यांची सेवा करण्याचा हात पुढे सरसावला आहे.
       
            तरुणपणात भक्ती करणे चूक आहे, असं म्हणणा-यांना इथे आल्यावर नक्कीच कळेल की तरुण वर्गाने परमात्म्याची आणि माय चण्डिकेची भक्ती आणि दिनांची सेवा करण्याची ही संधी कधीच सोडू नये. आणि मुख्य म्हणजे संपुर्ण जगभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वैद्यकिय शिबिर होत असलेले आजवर ऐकले किंवा पाहिले नाही.
नक्कीच पुढील वर्षीही ह्या शिबिराचा भाग होण्याचे भाग्य ह्या माझ्या झोळीत घालावे, हीच आई चण्डिके चरणी मनःपुर्वक प्रार्थना.

प्रणिल टाकळे