गुरुपौर्णिमा...
    
                 "गुरु" ह्या एका शब्दांतच सारं विश्व सामावलं आहे, असं  
डोळे बंद करुनही आपण बिनधास्त म्हणू शकतो. कारण त्या शब्दांतच 
तशी ताकद असते, एक प्रकारचं विलक्षण "सामर्थ्य" असतं. मनाला सतत हवी असलेली चालना, उमेद, उत्साह, आधार अशी एक ना अनेक प्रकारे आपल्यासाठी मदत करणारा गुरु(सामर्थ्यदाता) हा नेहमी पुज्यचं असतो. 
   
               आपण म्हणतो की जन्म होण्याआधी नऊ महिने गर्भात  आपल्याला वाढवणारी, पालनपोषण करणारी माता ही प्रत्येक बाळाची आद्यगुरु असते. १००% खरं आहे. कारण तिच्यामुळेच आपण ह्या 
जगात वावरु शकतो. मात्र आपल्या जन्माची आखणी आखणारी, आपला जन्म होण्या कितीतरी आधीच आपल्यासाठी उत्तम प्लॅन बनवणारी, आपला व आपल्या आईचाही जीवापाड सांभाळ करणारी "ती" विश्वाची 
आद्यशक्ती "जगदंबा" ही आपली गुरुचं असते किंबहुना आहे.

       
          आपल्या जीवनाला आकार-उकार काढणारा "तो" एकमेव असतो 
(तो अशा उद्देशाने म्हटलं आहे कारण "तो" म्हटल्याने गुरुचा सहवास 
जवळून मला अनूभवता येतो. मात्र त्यांच्या विषयीचा आदर ढळू न 
देण्याची काळजी मी नक्कीच घेतो). अगदी क्षणाक्षणाला "तो" सोबत 
असतोच, ह्याची जाणिव मनात घर करुन आहे.

"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...
चालविसी हाती धरोनिया..."


              ह्या अभंगाच्या ओळी सतत "त्या"च्यासाठी गुणगुणाव्या  
वाटतात. कारण "सांगती" म्हणजे माझ्यासाठी माझ्या जन्माआधीपासून ते माझ्या ह्या जगातल्या प्रवासापर्यंत तसेच पुढच्या जगातल्या 
प्रवासातही मला "तो"च गुरु म्हणून लाभणार, ह्याची पुरेपुर खात्री असलेला.

          जो माझी साथ कधीच सोडणार नाही, असं पक्कं वचन दिलेला. 
त्याच्या विरहाने ही डोऴ्यात पाणी दाटून आणणारा तर कधी अचानक समोर आल्यावर त्याला न्याहाळण्यात पुन्हा ओघऴणारे आनंदाश्रू 
टिपणारा.

    
          आपल्या आयुष्याला एका मूर्तीकाराप्रमाणे छिन्नी-हातोड्याने 
हळूहळू त्याचे घाव लागू न देता सुबक आकार "तो"च गुरु देतो. "त्या"च्या 
जीवनाच्या शाळेत कोणीच नापास होत नाही, तर उलट नवनवीन व सोप्यात सोप्या संधी मिळतचं असतात. आणि त्याचमुळे आपले जीवन 
चांगल्याच मार्गावर मार्गक्रमण करत असतो. "तो" नुसता प्रेमळ असूनही 
चालत नाही, तर कधी कधी "त्या"ने त्यांच्या काठीच्या मारापेक्षा शब्दांचे
मार आपल्याला बरचं शिकवून जातात.

   

        शिष्य हा अगदी पुर्णपणे "त्याच्या"वर अवलंबून असताे. आणि 
त्यामुळेच "तो" जे जे आपल्याला शिकवतो, त्याची उजऴणी आपण आपल्या जीवनात करतो, तेव्हा "त्याला" त्याच्या शिकवण्याचे सार्थक 
झाल्याचे वाटते.

         नेहमी कुणापुढेही अगदी कशासाठीही लाचार झालेल्या शिष्याला
"तो" बघूच शकतं नाही. कारण लाचारी पत्करणे, म्हणजे मोठे पाप आहे, 
हेच "तो" शिकवतो.


         "जियेंगे तो शान से..." असं छातीठोकपणे सांगणाराही "तो" मनात 
जिद्द व लढाऊ वृत्तीची भावना कायम जागृत ठेवतो. कारण समर्थ गुरु
असल्यावर आनंदात जगणे, हे आलेच. अन्याय कदापि सहन न करण्याची शिकवण ही "तो"च देतो व अन्यायाविरद्ध दोन हात करण्याची 
सामर्थ्यशाली पाठबळही "तो"च पुरवतो, हे ही तेवढेचं महत्त्वाचे आहे. शिक्षण हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण घेतचं असतो. 
त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत "गुरु"ची साथ ही By default असतेच. 
आणि ती असणचं प्रत्येक शिष्यासाठी श्रेयस्कर आहे.

            "तो"... गुरुविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण त्याची दरक्षणी होणारी आठवण कमी न होणारी आहे. कारण "तो" आहे म्हणून 
मी आहे. आणि "तो" गुरु म्हणून मला दर जन्मी मिळावा, ह्याच सदिच्छेत आजचा दिवस सुरु केला.

प्रणिल टाकळे