अनुभवाचे बोल...
आयुष्य हे आपल्या प्रत्येकासाठी जणू अनुभवांची मालिकाच असते. ज्यात आपल्याला कधी कधी असे अनुभव येतात ज्यांचा आपण विचार पण केलेला नसतो. तर कधी असे अनुभव येतात कि आपल्याला त्याविषयी काहीशी पुसट अशी कल्पना असते. अनुभवांतून माणूस शिकतो असं म्हणतात तेसुद्धा खरच आहे. कोणीही जन्माला येताना काहीच शिकून आलेला नसतोच. हळू हळू मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन शिकायला मिळते आणि त्याच शिकण्यातून अनुभवांची शिदोरी मिळत जाते. हि शिदोरी कधीच कोणीही कोणाची चोरू शकत नाही. कारण प्रत्येकजण हा आपल्या जीवनाचा शिल्पकार जसा असतो ना तसाच तो आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी पाहत असतो, करत असतो आणि त्यातून नवीन शिकतच असतो.
कधी आपण म्हणतो कि मला हि गोष्ट करायला येत नाही किंवा जमत नाही. पण आधीच आपण एका कामासाठी नकार घंटा लावली तर ती गोष्ट होणारी असेल तरी आपल्या मनात भीती असल्यामुळे किंवा कधी दडपण असल्याने ते काम आपण योग्य प्रकारे करू शकत नाही किंवा त्यात चुका होत राहतात आणि त्यावेळी आपण त्या गोष्टीला योग्य तो न्याय देण्यासाठी असमर्थ ठरतो. मग ह्या साठी काय केलं पाहिजे तर सर्वात आधी आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे. "नदीत पडल्याशिवाय पोहायला येणार नाही".म्हणजे जर मी नीट मनापासून प्रयास केले तर ते नक्कीच पूर्ण होतात. कारण ते करण्यासाठी आपण आधी त्यासाठी नीट planning करत असतो आणि त्यासाठी ते योग्यरीत्या कसे पूर्ण होईल त्यासाठी धडपडत असतो. मग ते काम पूर्ण होतेच. आधीच मी म्हटले कि हे काम होणारच नाही तर कस चालेल? त्यासाठी आधी कोणतेही काम करताना ते ज्यांना कोणाला येत असेल त्यांच्या कडून माहिती घेऊन ते कसे करता येईल ह्याची मांडणी करूंन घेण्याची आणि मग ते आपल्या प्रयासातून उतरवायचे. मी चुकेन असे मनात ठेवले तर चूक होईलच. आणि आपल्याला आपल्या कामावर जम बसणार नाही.
कोणत्याही गोष्टीत आधी आपण फ्रेशर असतो आणि मग नंतर हळूहळू आपल्याला त्यात experience येतो आणि तो वाढत जातो. आणि हाच अनुभव मग आपल्याला अनेकदा काही क्रिटिकल काम असेल त्यावेळी उपयोगाला येत असतो आणि आपली प्रगती होत जाते. मग इथे आपण हि आपल्याला आलेले अनुभव नेहमी इतरांना सांगून आपल्या ज्ञानांची वाटणी करताना पुढे मागे पाहू नये. कारण ज्ञान वाटल्यानेच ज्ञान वाढते. त्यातूनही हि अनुभव येत जातो आणि आपल्याला इतरामुळे आणि इतरांना आपल्यामुळे नवीन शिकायला मिळते.
कधी माणसं ओळ्खताना कि आपण अनुभव नसल्याने चुकतो पण तरीही त्यातही कालांतराने आपल्याला ह्यातही अनुभव येतोच आणि मग एकदा का तो अनुभव आला कि मग आपण पुढच्या वेळेला "ताक सुद्धा फुंकर मारून पितो", त्यानुसार माणसं ओळखायला लागतो आणि मग ती समाज सुद्धा हळू हळू आपल्याला मनाशी दृढ होत जाते.
अनुभव आणि त्यातून मिळणारी शिकवण जरी आयुष्यभराची आपल्याला शिदोरी देऊन जाते, तिची सांभाळ करून त्या अनुभवांना जपून ठेवून, मनात कधीच कोणाविषयी काहीच ऊण-धुणं ना ठेवता आपला प्रवास चालू ठेवून नव्या अनुभवना सामोरे जात राहायचे कारण ह्यालाच तर जीवन म्हणतात.
प्रणिल टाकळे
जपून जपून जपून जा रे....
कृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्याला माहीत आहेच की महाविष्णूच्या कृष्ण ह्या रूपाचा जन्म दिवस. आता अगदी प्रत्येकाला कृष्ण जन्माची पूर्ण कथा माहीत आहेच. तसेच त्याच्या लहानपणीच्या निरनिराळ्या लीला सुद्धा माहीत आहेतच. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच लोणी खूप आवडीचे असते. व त्यासाठी तो गोकुळात अनेकांच्या घरी जाऊन लोणी चोरून खात असे. लोणीच्या मडक्यापर्यंत हाथ पोहोचावा म्हणून आपल्या सवंगड्याच्या सहाय्याने थर लावून त्यावर चढून त्या उंचवरच्या मडक्यातले दही, लोणी आवडीने श्रीकृष्ण खात असे आणि इतरांनाही वाटत असे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण काळापासून गोपाळकाला सण साजरा केला जातो. एकवर एक असे मानवी मनोरे उभारून उंच बांधलेली दही हंडी फोडायची असते. ज्यात एकमेकाला हाथ देऊन आधार दिला जातो आणि एकजुटीने महत्व पटवून दिले जाते. एक एकसंघपणा पाहायला मिळतो.
आधी चार थर अशी दही हंडी करून हा सण साजरा केला जात असे. पण सध्या ह्यात स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे. तब्बल आठ तर नऊ थर लावून जवळ जवळ अनेक फूट उंच बांधलेली दहीहंडी फोडली जाते. व ह्यात अनेक लाखाची आणि मानाची हंडी जागोजागी असते. हा उंच थरार पाहूनच आपल्या मनात धडकी भरते की एवढ्या उंच प्रमाणात कसलाच आधार ना घेतला एवढ्या व्यक्ती वर चढून हा मनोरा रचून ही स्पर्धा केली जाते. दहीहंडी फोडली जाते, अनेक जण उंचावरून पडतात. प्रचंड प्रमाणात लागतं सुद्धा. अनेकदा असे जीव जातात किंवा कायमचे शरीर निकामी होऊन जाते. कोणाला खांद्याचे त्रास तर कोणाला पायाचे, गुडघ्याचे त्रास उद्भवतात व ते आयुष्यावर जडतात.
सध्या हे प्रत्येक जण स्वतःचा विमा काढून घेतात. का??? कारण त्यांना माहीत असतेच की ह्या खेळात रिस्क आहेच. आणि कोणती ना कोणती दुखापत होणारच आहे. हा विमा चुकून त्यांच्या काही बरं-वाईट झाल्यावर त्यांच्या कुटुंबांना त्याचा मोबदला मिळणार असतो, ह्यासाठी ही काढतात. मला मान्य आहे की गोपाळकाला हा दही हंडी शिवाय अपुरा आहे. मात्र त्यात कोणामुळे सणाला गालबोट लागू नये ही काळजी अगदी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण ह्या सणाला आज पर्यन्त अनेकदा बातमी झळकत असते की अमुक अमुक व्यक्ती पडला किंवा दगावला. ऐकताना सुद्धा अंगावर त्यावेळी काटा येतो. कारण हा विचार त्यांनी केला पाहिजे की आपण जो आज थरार करायला जात आहोत, मग आपल्या मागे आपले कुटुंब आहे ज्यात आई वडील किंवा बायको व लहान मुले आहेत. आपल्याला काही झालं तर त्यांना काय होईल आणि पैसे विम्याचा मिळाला तरी किती दिवस पुरणार आहे???
मोठमोठ्या बक्षिसांची आमिषे दाखवली जातात. मानाच्या हंड्या बांधल्या जातात. मात्र एवढ्या उंचावर चढून हजारो लोकांमध्ये पडलेला व्यक्ती कोण आहे कसा आहे ह्याची विचारपूस केली गेली पाहिजे, त्यांना प्रथमोपचार लवकरात लवकर मिळाले पाहिजे. नाही तर बघ्यांची गर्दी जास्त असेल आणि जखमी गोविंदाला तिथे पोचायला वेळ जाईल, हा विचार केला गेला पाहिजे.
सण आहे. तो पवित्र आहे मग त्याच पावित्र्य सुद्धा तसंच राखलं गेलं पाहिजे. आपण त्या श्रीकृष्णाचे गोप बनून दहीहंडी साजरी करायला निघतो. मात्र अश्या वेळी ज्यांना ही दहीहंडीची कला अवगत आहे त्यांना चांगल्या नजरेने पाहिले जाते की ह्यांना एवढ्या उंचीवर जाऊन ही हंडी फोडता येते. मात्र त्याचवेळी मोठ्या ट्रक, टेम्पो मधून प्रवास करताना आजूबाजूला जाणाऱ्या प्रवासींनीही त्रास देणे, छेडणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र आपण अश्या सणाच्या प्रसंगी असे वागणे चुकीचे आहेच. माझी प्रत्येक गोविंदा पथकाला एक विनंती आहे की अशी मस्करी किंवा चुकीचे वर्तन कोणत्याही स्त्रीशी जाता येताना करू नका. कारण भारतासारख्या मोठ्या देशात स्त्रीला एक उच्च स्थान आहे. व आपल्यालाही आई, बहीण आहे व आपल्या समोर कोणी त्यांचाही असा आपल्या सारखा अपमान करू शकतो. म्हणून आपण ही करू नये आणि श्रीकृष्णाचे उत्तम गोप बनून त्याच्या ह्या सणाचा आनंद मनापासून घेऊ.
दहीहंडीचा थरार नक्कीच अनुभवा पण जे काही कराल ते जपून करा आणि एकमेकांना मदत करा.
प्रणिल टाकळे.
अगदी बरेच दिवस काही केल्या गाडी(ब्लॉगची) रुळावर येत नव्हती किंवा स्वतःला कामाच्या व्यापात इतकं जखडून घेतलं की गाडी रुळावर येऊ पाहत नव्हती, हे कोडे मला तरी उलघडत नाही आहे. पण ह्या पांडुरंगाच्या नावाने आणि अकारण कारुण्याने पुन्हा एकदा की गाडी चालवायला घेऊया, हे ठरवलं आणि आपसूकच ह्याच अनंतमयी पांडुरंगाच्या महतीच्या काही ओळी सुचल्या त्या ह्या पांडुरंगा चरणी अर्पण करतो आणि माझ्या आयुष्याची "वारी" तुझ्या पर्यंत पोहोचण्याची अखंडपणे चालूच राहो, ही देवा विठ्ठला तुझ्याच चरणी प्रार्थना...
मनोमनी तुझा रे मी वारकरी...
काय आहे तुझे रूप,
काय आहे तुझी कीर्ती,
जे काही साठवले ते सर्व,
अर्पितो तुझ्याच रे पायी...
तुझा रंग कसा हे वेगळा,
तुझ्या नामाचा छंद आगळा,
तुझ्या तालावर नाचावयाला,
आलो आज रे तुझिया दारी...
इतरांकडे काही मागत नाही,
भरलास तूच ह्या दिशा दाही,
सोडियेली आता चिंता सारी,
पायी मारण्या रे घट्ट मिठी...
सुखाने भरली तू झोळी माझी,
ओवी गातो मी नेहमीच तुझी,
प्रत्यक्ष जरी येणे जमले नाही,
मनोमनी तुझा रे मी वारकरी...
प्रणिल टाकळे
असे नाते बहीण-भावाचे
वेगळीच व्याख्या ती,
वेगळेच असते नाते,
सर्व नात्यांच्या शिखरी आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
बहीण लहान असो वा मोठी,
भावासाठी तिचा जीव तुटतो,
रोजच्या भांडणातही सुख आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
मोठ्या बहिणीकडे हट्ट तर,
लहान असेल तर दादागिरी,
त्या आगळेपणातही प्रेम आहे,
असे नाते बहीण-भावाचे...
हे नाते रक्ताचेच हवे असे नाही,
कोणातही सहज गुंफले जाते,
आजन्मभर ते टिकवण्यासाठी
असे नाते बहीण-भावाचे...
एकमेकांच्या खोडीत साथ असते,
विनाकारण त्रासाला जोड असते,
एकमेकांशिवाय ह्यात गोडी नाही,
असे नाते बहीण-भावाचे...
एक तरी बहीण नक्की असावी,
जिला मनातले सर्व सांगता यावे,
ज्यांच्यात दोघांची गुपिते दडली असतात,
असे नाते बहीण-भावाचे...
प्रणिल टाकळे
पुस्तक प्रकाशन -एक अविस्मरणीय संध्याकाळ
"पुस्तक प्रकाशन" हे आज पर्यंत ऐकून होतो. म्हणजे टीव्हीवर किंवा वृत्तपत्रामध्ये कोणा ना कोणा लेखक-लेखिका, कवी-कवयित्री ह्यांचे लेख संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाले असे समजायचे. कधी असा मोठा कार्यक्रम पाहिला नव्हता. तर त्याचे निमंत्रण असणे लांबची गोष्ट आहे. कारण ज्यांचे हे असे पुस्तक वगैरे प्रकाशित होतात त्यांचा स्वतःचा आधी गाढा अभ्यास असतो आणि त्या कार्यक्रमाला आलेल्या मंडळींना त्या त्या विषयाची सखोल माहिती असते. अश्या व्यक्तींना साधारण निमंत्रण मिळते अशी साधी कल्पना आजवर मनात होती. इच्छा मात्र होतीच कि कधी आपण अश्या कार्यक्रमाला जाऊ शकतो का?
शेवटी म्हणतात, इच्छा चांगली असली तर तो परमात्मा आपल्याला त्याचे फळ देतोच. आणि ते देताना काहीच तो हातचं राखून ठेवत नाही.
एके दिवशी दुपारी ऑफीसमध्ये काम सुरु असताना एक फोन आला. "हॅलो, प्रणिल का? तुम्हाला २६जून २०१७ रोजी संध्याकाळी लोटस पब्लिकेशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या दोन पुस्तकांच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण करण्यासाठी हा फोन आहे". आधी काही कारणास्तव हा आलेला फोन माझ्या पर्यंत पोहोचला नव्हता. शेवटी त्याच अफाट प्रेमाचा स्त्रोत असलेल्या भगवंताने पुन्हा हा फोन माझ्या पर्यंत येऊ देऊन ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. फोन ठेवला तेव्हा क्षणभर काहीच सुचत नव्हते कि हा फोन आपल्याला येण्याचे कारण कोणते? किंवा आपण तर देत असलेल्या कमी योगदानाच्या बदल्यात हे दान मिळणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. तरी काही तरी त्याच भगवंताची कृपा आहे, हे जाणून घेतले. (प्रत्येक वेळी सर्व श्रेय भगवंताला दिले तर त्याची सर्व पुढची वाटचाल 'तोच' परमात्मा करतो म्हणून त्याच्यावर पूर्णतः आपले जीवन सोपवून आपले कार्य चालू ठेवावे, हि सुद्धा त्यांचीच शिकवण आहे).
ही संध्याकाळ खूप वेगळी असणार ह्याची कल्पना आधीच होती पण तरीही त्या अभूतपूर्व आणि पहिल्यांदाच अनुभवता येणाऱ्या ह्या पुस्तक प्रकाशन संध्येची मी वाट बघत होतो आणि ती संध्याकाळ आली. 'राजा शिवाजी विद्यालय' अनेक वर्षांपासून बघत आलो आहे. त्या शाळेलाच एक असं वेगळेपण आहे कि नुसतं नाव जरी समोर आलं तरी त्याविषयी आदर वाटतो. माझ्या पदव्युत्तर शिक्षणाला(M.Sc. Computer Science)साठी मी ह्या शाळेच्या नजीकच असलेल्या रामनारायण रुईया महाविद्यालयात होतो. तेव्हा अनेकदा ह्या शाळेसमोरून आम्ही सर्व जात असू आणि लहानपणी अल्फा मराठी(सध्याचे झी मराठी)वर अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे "दे धमाल" मला आवडायची आणि त्या मालिकेचे चित्रीकरण ह्याच शाळेत केलेले होते. तेव्हा पासून ह्या शाळेचे आकर्षण होते आणि ह्या निमित्ताने ते पूर्ण झाले. तसेच श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट तर्फे राबविण्यात येणाऱ्या कोल्हापूर मेडिकल कॅम्पसाठी उपयुक्त असलेला "ओप्टोमेट्री"चा (डोळे तपासणीचा) कोर्स हि ह्याच शाळेत झालेला. आणि आज पुन्हा ह्याच शाळेच्या प्रांगणात असलेल्या प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात हा सोहळा होणार हे ऐकल्यावर सर्व पुन्हा आठवले आणि अधिक आनंदाने ह्या सोहळ्याच्या स्थळी पोहोचलो.
तिथे पोहोचताच क्षणी अनेक माझे मित्र-मैत्रिणी भेटल्या आणि ह्या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या एकमेकांच्या वेगवेगळ्या reactions पाहण्यात आनंद द्विगुणित होत होता. काय नक्की असेल ह्या दोन पुस्तकात आणि कशा संदर्भात असेल ह्याची कुतुहलता मनात कल्लोळ करत होती आणि रंगमंचावरचा पडदा हळुवारपणे बाजूला सारला गेला आणि त्यावर सर्वांचे लाडके अभिनेते श्री सचिन खेडेकर होते.त्याच्या बाजूला ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते त्या आशालताताई वाबगावकर आणि डॉ. वसुधाताई आपटे होत्या. तर दुसऱ्या बाजूला निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण सर दीक्षित आणि त्याच्या बाजूला "लोटस पब्लिकेशन"चे एम.डी. समिरसिंह दत्तोपाध्ये होते. आणि ह्या सर्वांच्या बरोबर रंगमंचावर ह्या विश्वाची जननी आदिमाता महिषासुरमर्दिनीची मनोहारी तसबीर होती. कार्यक्रमाची सुरुवातच आई जगदंबेच्या सुंदर "श्री शुभंकरा स्तवना"ने झाली. वातावरणात एक विलक्षण अशी सुमधुरता आली आणि मग निवेदकांनी त्यांच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले.
सर्वांत आधी रंगमंचावर असलेल्या प्रत्येक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि लोटस पब्लिकेशनच्या भाग असलेल्या कल्पना नाईक ह्यांनी लोटस पब्लिकेशन आणि "प्रत्यक्ष"ने आजवर केलेल्या वाखाण्याजोग्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने त्यांनी ह्या वृत्तापत्राचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी लिहिलेल्या "तिसरे महायुद्ध" ह्या लेखमालेचा उल्लेख केला. तसेच काही दिवसांपूर्वी ह्याच संस्थेने प्रकाशित केलेल्या "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले हेही सांगितले.
मग ह्या दोन्ही पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. पहिले पुस्तक म्हणजे "गर्द सभोवती". त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाला पाहताच क्षणी कळले की आशालताताईंच्या "गर्द" हिरव्यागार मनाने, हृदयाने अनुभवलेल्या अनेक निरनिराळ्या अनुभवाची सुंदर लेखमाला असणार आहे. आणि त्या वाचल्याने आपल्या जीर्ण- थकलेल्या मनाला नवीन तजेला मिळणार आहे एवढ मात्र नक्की. आजवर आशालताताईंना मी चित्रपट, नाटक, मालिका ह्यातच पहिले होते. मात्र "प्रत्यक्ष- बिगर राजकीय दैनिक" ह्या वृत्तपत्रामध्ये त्यांचे आलेले ललितलेख वाचले आहेत. आणि एवढ्या आपल्या वयालाही लाजवेल असल्या आशलताताई ह्या वयात अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचे लिखाण सुरूच ठेवत आहेत.
ह्या पुस्तकाची प्रस्तावना आजचा आघाडीचा नट सुबोध भावे ह्यांनी लिहिलेली आहे. आणि आशालता ताई ह्यांना त्याच्या माँ बोलण्यातच सर्व काही त्याचा त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम दिसून येते.
दुसरे पुस्तक म्हणजे "गुन्हेगारांचे कर्दनकाळ" आणि त्याच्या लेखिका आहेत डॉ. वसुधाताई आपटे. "फॉरेन्सिक लॅब" म्हणजे गुन्हेगारांच्या त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्यावर केले जाणारे आणि त्या गुन्ह्याच्या खोल जात येण्यासाठी केले जाणारे प्रयास म्हणजे न्यायवैद्यकशास्त्र. हे आजवर आपण टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका CID मध्ये पाहिले आहे पण ह्याच विषयाचा अभ्यास केलेल्या वसुधाताईंनी ह्या पुस्तकात त्यांनी ह्या संदर्भात असलेल्या समज-गैरसमज ह्याला जागा उरू न देण्याचे उत्तम कार्य कसे केले ह्याची नोंद आहे. आणि ह्या पुस्तकाची प्रस्तावना ह्या कार्यक्रमाला आलेले निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण सर दीक्षित ह्यांनी लिहिली आहे.
तसेच डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांच्या नायर हॉस्पिटलमध्ये त्या वेळी कार्यरत असलेल्या आणि फॉरेन्सिक मेडिसिन ह्या विषयांच्या प्रमुख असलेल्या डॉ. वसुधाताई ह्यांच्याविषयी मनभरून लिहिले आहे. त्यात ते आवर्जून सांगतात की त्या एक अश्या शिक्षिका होत्या ज्यांनी हा विषय समजण्यास किचकट असूनही तो कशाप्रकारे सोपा करून सांगितला आणि त्यांना काही doubts विचारताना कोणालाही भीती वाटायची नाही. कारण त्या मुळातच प्रेम, विद्यार्थ्याविषयीचे वात्सल्य आणि उत्तम शिक्षिका ह्याचे एकत्रित समीकरण होते.
आशालताताईंच्या ह्या पुस्तकाविषयी त्यांनी बोलताना म्हटले की ह्यांची हि नवी बाजू पाहताना आणि तेही पुस्तक रूपात आल्याचे बघताना आनंद होत आहे. आणि जवळ जवळ ५० वर्षांपूर्वी न्यायवैद्यकशास्त्राचे शिक्षण एक महिला घेऊन त्यात ३५ वर्षे अविरतपणे आपले कार्य केले ह्याचा आढावा घेताना डॉ. वासुधाताईंचा उल्लेख मानाने घेतला कि त्याकाळीही त्यांनी हे शिक्षण घेतले हि अभिमानास्पद गोष्ट आहे. दोन्ही लेखिकांनी जेव्हा त्यांचे मनोगत काही शब्दांत व्यक्त केले त्यात एक वाक्य प्रामुख्याने जाणवत होते की त्यांच्या ह्या मोठ्या कारकीर्दीनंतर "प्रत्यक्ष" सारख्या वृत्तपत्रामध्ये लिहीण्याची संधी दिली आणि सर्वात जास्त विश्वास ज्यांनी ठेवला त्या "प्रत्यक्ष"च्या कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. डॉ. वसुधाताई आपटे ह्यांचे डॉ. जोशी हे नायर हॉस्पिटलमधील विदयार्थी होते तर आशालताताईंचे डॉ. जोशी हे मार्गदर्शक गुरु आहेत. दोघींनी डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांनी त्यांना केलेल्या सक्रिय पाठिंब्याचे न विसरता आणि आवर्जून भाषणात समावेश केला.
सर्वात पर्वणीची गोष्ट म्हणजे सोहळयाची सांगता झाल्यावर रंगमंचावर दोन्हीं लेखिका त्यांच्या लिखित पुस्तकावर त्याची स्वाक्षरी देण्यास न कंटाळता बसल्या आणि त्यांनी अगदी सगळ्यांना स्वाक्षरी दिली. मनात हा क्षण समावताना मन हिंदोळे घेत होते आणि हा दिवस आयुष्यात सोनेरी अक्षराने कोरला जात होता. पण ह्या अश्या सोहळ्याचा भाग होता येईल असे कधीच वाटले नव्हते. मात्र "प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक" आणि "अनिरुद्ध कलादालन"नी हि संधी माझ्या आयुष्यात दिली ह्यात मी मला धन्य मानतो.
आता तर आपण ऑनलाईन सुद्धा ह्या पुस्तकांचा आपण लाभ घेऊ शकतो.
"गर्द सभोवती" लेखिका- आशालता वाबगावकार
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GRSMDL
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ"- लेखिका डॉ. वसुधा आपटे
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL
प्रणिल टाकळे
एम्बेडिंग -३
आतापर्यंत आपण एम्बेडिंगच्या विषयी वेगवेगळी माहिती घेतली. प्रत्येक माहिती हि तेवढीच उपयोगाची आहे.
आता काही अजून नवीन एम्बेडिंगचा पर्याय आहे आणि तो म्हणजे एम्बेडिंग फेसबुक वर आणि ट्विटरवर . नवल वाटतयं????
पण हो.. हा पर्याय उपलब्ध आहे. इतर काही संदेशासारखाच आपण आपल्याला हव्या त्या लिंक्स एकाच वेळी सर्वांपर्यत पोहचवू शकतो. व
त्यासाठी जरूर खालील लिंकवर क्लिक करा.
प्रणिल टाकळे
प्र-निलयम्
प्र-निलयम् निलयम् म्हणजे असे घर की जिथे काही कमी पडत नाही. निलयम्चा अर्थ असा आहे की एक असे घर की जिथे हसताना, बागडताना, काही मागताना पुढे मागे बघण्याची गरज नसते. प्र-निलयम् मध्येही आपल्याला नवनवीन आणि भन्नाट अँपस् आणि सॉफ्टवेअरविषयी ओळख घडणार आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यावरही ते त्या फोनचा किती आणि कसा स्मार्टली वापर करु शकतात ह्यावरुन त्या व्यक्तिचा स्मार्टनेस हल्लीच्या जगात पाहिला जातो. साधारण ५०वया पासूनच्या पुढची व्यक्ती स्मार्टफोन फक्त कॉल रिसिव्ह करण्यासाठी व हल्ली व्हॉस्टअँपसाठीच वापरताना दिसतात. पण ह्याच्याही पलीकडे स्मार्टफोनचा वापर आपणही करु शकतो, हा विश्वास त्यांच्यात जागवण्याचा मुख्य प्रयास ह्या प्र-निलयम् Blog चा असणार आहे. आणि त्याच बरोबर काही कविता, लेख देखील ह्या Blogद्वारे लिहीण्याचा माझा नक्कीच प्रयास असेल.
ओझं अपेक्षांचं...